Join us  

T20 WC: भारतीय युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला घाम फोडणार; वर्ल्डकपची तयारी करून घेणार

T20 World Cup 2021: आयपीएलमध्ये पदार्पणातच सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय युवा गोलंदाज उमरान मलिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मोठी संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 11:01 PM

Open in App

T20 World Cup 2021: आयपीएलमध्ये पदार्पणातच सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय युवा गोलंदाज उमरान मलिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मोठी संधी दिली आहे. उमरान मलिक याची ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा नेट्समधील सरावासाठीचा गोलंदाज म्हणून निवड केली आहे. सराव शिबिरांमध्ये उमरान त्याच्या वेगवान अस्त्रांनी भारतीय फलंदाजांना नेट्समध्ये घाम फोडणार आहे. भारतीय फलंदाजांचा वेगवान गोलंदाजीचा सामना करण्याचा उत्तम सराव व्हावा यासाठी उमरान मलिकची निवड बीसीसीआयनं केली आहे. 

आयपीएलमध्ये यंदा सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केलेल्या उमरान मलिकनं सातत्यानं १५० किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधला सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर जमा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्यानं तब्बल १५३ किमी प्रतितास वेगानं टाकलेला चेंडू यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. इतकंच नव्हे, तर आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. उमरानच्या गोलंदाजीतील वेगाचा भारतीय फलंदाजांना सरावासाठी खूप फायदा होऊ शकतो यासाठी बीसीसीआयनं त्याची निवड केली आहे. 

"उमरान मलिक भारतीय संघासोबतच यूएईमध्ये थांबणार आहे. आयपीएलमध्ये त्यानं उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना नेट्समध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीचा सराव देणं ही खूप चांगली कल्पना आहे. यासोबतच विराट आणि रोहितसारख्या गुणवान फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करण्याचीही संधी उमरान मिळेल", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आयपीएल २०२१
Open in App