टी-२० : मालिकेत सरशी कुणाची? भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना आज

India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज, रविवारी टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 06:15 AM2022-06-19T06:15:21+5:302022-06-19T06:15:58+5:30

whatsapp join usJoin us
T20: Who won the series? The fifth match between India and South Africa today | टी-२० : मालिकेत सरशी कुणाची? भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना आज

टी-२० : मालिकेत सरशी कुणाची? भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना आज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज, रविवारी टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. उभय संघ २-२ ने बरोबरीत असून भारताचा युवा संघ वेगवान गोलंदाजी आणि मधल्या फळीतील दमदार फलंदाजीच्या बळावर मालिका विजय मिळवू शकतो, असे जाणकारांना वाटते.

भारताने आठ दिवसांत चार सामने खेळले असून कोच राहुल द्रविड यांनी सातत्य राहावे यासाठी संघात बदल केलेले नाहीत.  दोन सामने गमावल्यानंतर भारताने तिसरा सामना ४८ आणि चौथा सामना ८२ धावांनी जिंकला. मागच्या सामन्यात दिनेश कार्तिकने सूत्रधाराची भूमिका बजावली; तर हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी अपेक्षेनुरूप कामगिरी केली.  युझवेंद्र चहल पाचव्या सामन्यात चमत्कार करण्यास इच्छुक असेल.

तेम्बा बावुमा जखमेतून सावरला नसल्यास पाहुण्या संघाचे नेतृत्व डिकॉक करू शकतो.  मागच्या दोन्ही सामन्यांत कमी उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर द. आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली.  दुसरीकडे, भारतीय मारा भेदक ठरत आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास ऋषभ पंत हादेखीेल हार्दिक आणि राहुलसोबत भविष्यातील कर्णधाराच्या शर्यतीत सहभागी  होऊ शकेल.

पाचव्या सामन्यात द्रविड यांच्याकडून काही बदल अपेक्षित आहेत. ऋतुराज गायकवाड अपयशी ठरत असून ईशान किशनकडे मर्यादित फटके आहेत. श्रेयसला प्रत्येक सामना खेळायला मिळाला तरीही तो संधीचे सोने करू शकला नाही. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यात सूर्यकुमारला संधी मिळाली. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांचा मारा उत्कृष्ट ठरत आहे.  फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी झालेली नाही. या सामन्यात फिरकीपटू निर्णायक ठरतील का, हे पाहावे लागेल.

कार्तिक हा माझा प्रेरणास्रोत - हार्दिक 
राजकोट : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने दिनेश कार्तिकच्या खेळीचे कौतुक करीत  संघाबाहेर राहिल्यानंतरही ज्या पद्धतीने त्याचे पुनरागमन झाले, तो प्रवास संघातील आणि संघाबाहेरील खेळाडूंसाठी प्रेरणास्पद असल्याचे म्हटले आहे. 
कार्तिकने अर्धशतकी खेळी केली. भारताने द. आफ्रिकेवर ८२ धावांनी विजय नोंदवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. कार्तिकसोबतच्या चर्चेत हार्दिकने जुन्या आठवणींना उजाळा दिला.  हार्दिक म्हणाला, ‘मी तुला सांगू इच्छितो की तू अनेकांच्या आयुष्याला प्रेरणा दिलीस. मला आठवते, तू संघाबाहेर असताना आपली चर्चा झाली होती. अनेकजण तू संपलास, असे सांगून मोकळे झाले होते. आपले लक्ष्य देशासाठी खेळणे असून, नंतर विश्वचषक आहे, असे तू म्हणाला होतास. त्यासाठी सर्वस्व पणाला लावले. असे पुनरागमन करणे फारच प्रेरणादायी आहे. अनेकांना तुझ्याकडून नव्या गोष्टी शिकायला मिळतील. शाब्बास माझ्या भावा, मला तुझ्यावर गर्व वाटतो.’

भारताने १७ रोजी १३ षटकांत ८१ धावांत चार फलंदाज गमावले होते. त्यावेळी कार्तिक- हार्दिक खेळपट्टीवर आले. दोघांनी ६५ धावांची भागीदारी करीत भारताला १६९ पर्यंत मजल गाठून दिली होती.

Web Title: T20: Who won the series? The fifth match between India and South Africa today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.