ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अॅशेज मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू सोमवारी दुबईहून क्विन्सलँडसाठी रवाना झाले आणि यावेळी त्यांच्यासोबत इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow), जॉस बटलर ( Jos Buttler) आणि ख्रिस वोक्स ( Chris Woakes) हेही होते. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंनी एकाच जार्टर्ड फ्लाईटमधून प्रवास केला. पण, इंग्लंडच्या खेळाडूंसाठी हा प्रवास डोकेदुखी ठरला. त्यांचे हाल झाले. चार्टर्ड फ्लाईटमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा जल्लोष करत राहिले आणि इंग्लंडच्या खेळाडूंना एका बाजूला बसून दुःखी मनानं हे सर्व पाहावं लागलं.
फ्लाईटमधून प्रवास करण्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल आर्थटन व मार्क वूड यांनी एक भविष्यवाणी केली होती. इंग्लंडच्या खेळाडूंचे या प्रवासात हाल होतील, असे त्यांनी सांगितले होते आणि तसेच घडले. अर्थटन म्हणाले की,''अॅशेज मालिका खेळायला जाणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना विमान प्रवासाचा आनंद लुटता येणार नाही. हा खूप मजेशीर प्रवास असमार आहे.'' मार्क वूडनं BBC सोबत बोलताना माजी कर्णधार आर्थटन यांच्या सूरात सूर मिसळला.
दोन्ही संघाचे खेळाडू एकाच फ्लाईटमधून का गेले?इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना कोरोना नियमांमुळे एकाच चार्टर्ड फ्लाईटमधून प्रवास करावा लागला. जर दोन्ही संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीआधीच बाहेर पडले असते तर त्यांनी वेगवेगळा प्रवास केला असता. पण, दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी एकाच चार्ट्ड फ्लाईटमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून बायो बबल टू बबल अशी व्यवस्था करता येईल. त्यामुळेच इंग्लंडच्या खेळाडूंना विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासोबत प्रवास करावा लागला.
८ डिसेंबर पासून अॅशेज मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी ८ ते १२ डिसेंबर ब्रिस्बेन येथे होईल. त्यानंतर १६ डिसेंबरला अॅडिलेड येथे दुसरी कसोटी, २६ डिसेंबरला मेलबर्नवर तिसरी कसोटी, ५ जानेवारीला सिडनीत चौथी आणि १४ जानेवारीला पर्थ येथे पाचवी कसोटी खेळवली जाईल.