आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय हा या बैठकीचा मुख्य हेतू होता. आजच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही ( आयपीएल) भवितव्य अवलंबून असल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) त्याकडे बारीक लक्ष होते. यापूर्वी याच विषयासाठी झालेल्या बैठकीत आयसीसीनं वेट अँट वॉचची भूमिका घेतली होती आणि त्यामुळेच आज काय तो अंतिम निकाल येणं सर्वांना अपेक्षित होते. ( ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED)
आयसीसी मुख्य कार्यकारी मनू सॅव्हनी यांनी सांगितले की,''सर्वांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य होते आणि त्यानुसारच सर्वानुमते निर्णय घेतला गेला. सर्व पर्यायांचा व्यवस्थित विचार करूनच आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय झाला. या कालावधीत आता सदस्य संघटनांना त्यांच्या मालिकांचे आयोजन करता येईल.'' ( ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED)
आयपीएलच्या मार्गातील अडथळा दूर, पण...
आयपीएलबाबत बीसीसीआयला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आयपीएलसाठीचं स्थळ आणि खेळाडूंची सुरक्षितता यासाठी बीसीसीआयला केंद्र सरकारकडून परवानगी मिळवावी लागणार आहे. आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिराती ( यूएई) या देशाला बीसीसीआयचे प्राधान्य असले तरी त्यांना केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 44 दिवसांता 60 सामने खेळवण्याची तयारी बीसीसीआयनं केली आहे. दरम्यान, यूएई क्रिकेट संघटनेनंही आयपीएलसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.