दुबई: आयपीएल २०२१ मध्ये खराब फॉर्ममुळे बाकावर बसलेला डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषक जिंकून देईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. अवघ्या महिन्याभरापूर्वी वॉर्नर मैदानावर कमी अन् बाकावर जास्त दिसत होता. वॉर्नरला हैदराबादच्या संघानं अंतिम ११ मध्येही स्थान दिलं नाही. वॉर्नरची ती अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांना वाईट वाटलं. मात्र ऑस्ट्रेलियाकडून खेळताना वॉर्नर सुस्साट सुटला. कांगारूंनी पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. त्यात वॉर्नरच्या खणखणीत फलंदाजीचा सिंहाचा वाटा आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीर म्हणून वॉर्नरला गौरवण्यात आलं. वॉर्नरला विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळणार नव्हतं. त्यावेळी संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. फिंचनं दाखवलेला विश्वास वॉर्नरनं सार्थ ठरवला. मला वॉर्नरच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता आणि तो कधीच कमी झाला नाही, अशा भावना फिंचनं अंतिम सामना जिंकल्यावर व्यक्त केल्या.
वॉर्नर खराब कामगिरी करत असतानाही त्याच्या पाठिशी कसा उभा राहिलास, असा सवाल फिंचला विचारण्यात आला. त्यावर तुम्हाला वॉर्नरकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती का, असा सवाल फिंचनं उपस्थित केला. 'मा निश्चितपणे त्याच्याकडून अपेक्षा होती. मी एक शब्द खोटा सांगणार नाही. पण काही महिन्यांपूर्वी माझं प्रशिक्षक जस्टिन लँगरशी बोलणं झालं होतं. डेवीची चिंता करू नका. तो मालिकावीर असेल, असं मी त्यावेळी म्हटलं होतं,' अशी आठवण फिंचनं सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदात वॉर्नरचं योगदान मोलाचं आहे. आयपीएल २०२१ मध्ये चाचपडणाऱ्या वॉर्नरनं विश्वचषक स्पर्धेत ७ सामन्यांत २८९ धावा केल्या. त्याच्या इतक्या धावा ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याही फलंदाजीला करता आलेल्या नाहीत. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरनं ४९ धावांची स्फोटक खेळी साकारली. तर अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ५३ धावांची उपयुक्त खेळी करत विजयाचा पाया रचला.