दुबई : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजयाची नोंद करताना बांगलादेशचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा ७३ धावांत खुर्दा उडवल्यानंतर ऑसींनी केवळ ६.२ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. लेगस्पिनर ॲडम झम्पाने १९ धावांत ५ बळी घेत बांगलादेशची दाणादाण उडवली.
या धमाकेदार विजयासह ऑस्ट्रेलियाने आपली धावगती उंचावताना ग्रुप-१ मध्ये ६ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान मिळवले. या गटातून इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठली असून, दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात मुख्य लढत रंगली आहे. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत आलेल्या बांगलादेशला ग्रुप-१ मध्ये एकही सामना जिंकता आला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत कांगारूंनी बांगलादेशला आव्हान देण्याची संधीच दिली नाही. मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड यांनी खंदे फलंदाज बाद करीत बांगलादेशची हवा काढली. यानंतर झम्पाने आपल्या भेदक फिरकीच्या जोरावर बांगलादेशला रडकुंडीला आणले. बांगलादेशकडून शमिम हुसैन (१९), मोहम्मद नईम (१७) आणि महमुद्दुल्लाह (१६) यांनी अपयशी झुंज दिली.यानंतर माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ५ षटकांत ५८ धावांची सलामी देत सामन्याची केवळ औपचारिकता बाकी ठेवली. कर्णधार ॲरोन फिंचने २० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४० धावा कुटल्या. मिशेल मार्शने ५ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १६ धावा चोपल्या. डेव्हिड वॉर्नरनेही १४ चेंडूंत १८ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक :बांगलादेश : १५ षटकांत सर्वबाद ७३ धावा (शमिम हुसैन १९, मोहम्मद नईम १७ आणि महमुद्दुल्लाह १६; ॲडम झम्पा ५/१९, जोश हेझलवूड २/८, मिशेल स्टार्क २/२१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ६.२ षटकांत २ बाद ७८ धावा (ॲरोन फिंच ४०, डेव्हिड वॉर्नर १८, मिशेल मार्श नाबाद १६; शोरिफुल इस्लाम १/९, तस्किन अहमद १/३६.)
ऑस्ट्रेलियाने ८२ चेंडू राखून विजय मिळवत टी-२० सामन्यात आपला सर्वात मोठा विजय साकारला.ॲडम झम्पा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ५ बळी घेणारा पहिला लेग स्पिनर ठरला, तसेच दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.