अबुधाबी : गतविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजय नोंदविणाऱ्या इंग्लंड संघाला आज बुधवारी बांगलादेशकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ग्रुप-१च्या या लढतीत इंग्लंडचे पारडे जड मानले जात असलेे तरी बांगला देशला भारतीय उपखंडात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा भरपूर अनुभव आहे.इयोन मोर्गनच्या संघाने विंडीजला १४.२ षटकात ५५ धावांत गुंडाळल्यानंतर ८.२ षटकात विजय साजरा केला होता. अबुधाबीतील ३२ अंश सेल्सिअस उकाड्यात इंग्लिश खेळाडूंना खेळणे अवघड होणार असले तरी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते. या खेळपट्टीवरील चारपैकी तीन सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले.इंग्लंड संघात बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरेन नाहीत, मात्र अष्टपैलू मोईन अली हा फलंदाजी आणि गोलंदाजीत या तिघांची उणीव जाणवू देत नाही. विंडीजविरुद्ध केवळ १७ धावात पॉवरप्लेमध्ये त्याने दोन फलंदाज बाद केले होते. आदिल रशीदनेही २.२ षटकात चार गडी टिपले.बांगला देश संघाने टी-२० विश्वचषकात २००७ पासून आतापर्यंत केवळ तीन सामने जिंकले. श्रीलंकेविरुद्ध मागच्या सामन्यात त्यांना शाकिब अल हसनचा पुरेपूर वापर करता आला नाही. तो दुसऱ्यांदा फलंदाजीला आला तेव्हा सामना बांगला देशच्या हाताबाहेर गेला होता. इंग्लंडच्या अस्थिर फलंदाजीला खिंडार पाडण्यासाठी मुस्तफिजुर रहमानच्या संघाला तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लाम यांचा वेगवान मारा प्रभावी ठरू शकेल.
सामना : दुपारी ३.३० पासून