दुबई : उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ शुक्रवारी टी२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे. अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे ही विजयी लय कायम राखण्याचे लक्ष असेल. भारताला या सामन्यात फक्त विजयच गरजेचा आहे नाही, तर नेट रनरेटदेखील सुधारण्याचे आव्हान आहे. त्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आणि दुसऱ्या संघांतील सामन्याचा परिणामदेखील अनुकूल असण्यावर आशा आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून भारताला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची धावगतीदेखील खूपच खराब झाली. भारतासाठी आता प्रत्येक सामना करो अथवा मरो, असा असेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना अफगाणिस्तान विरोधात लय सापडली. त्यांनी चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहितने गेल्या सामन्यात पुन्हा डावाची सुरुवात केली. त्याने शानदार अर्धशतक करत आपला फॉर्म सिद्ध केला. त्याने सामन्यानंतर मान्य केले की, पहिल्या दोन सामन्यांत काही चुका झाल्या. मात्र, सलग खेळल्याने मानसिक थकव्यामुळे अशा गोष्टी घडतात. रोहित, राहुल, ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी अफगाणविरुद्ध धावा केल्या. संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवमुळे संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. त्यासोबतच रवींद्र जडेजाही तळाच्या क्रमावर उपयुक्त ठरला. गोलंदाजीमध्ये चार वर्षांनी खेळणाऱ्या आश्विनने चार षटकांमध्ये १४ धावा देत दोन बळी घेतले.
निर्धार दणदणीत विजयाचापाकिस्तान सलग चार विजयांसोबतच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि न्यूझीलंडदेखील ग्रुप दोनमधून पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. अशात न्यूझीलंड जर, नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर भारतासाठी उपांत्य फेरीची आशा असू शकते. भारतीय संघ सध्या तेच करणार आहे जे, त्यांच्या हातात आहे. विराट कोहली आणि संघाचे लक्ष्य हे स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावरच असेल.
कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर म्हटले की, आश्विनचे पुनरागमन सकारात्मक राहिले आहे. त्याने त्यासाठी खूप मेहनत घेतली. आयपीएलमध्येही त्याने नियंत्रण आणि लय दाखवली आहे. तो चतुर आणि बळी घेणारा गोलंदाज आहे. वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने आश्विनला संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबाव सहन करण्यात त्याचे अपयश समोर आले. त्याची पुढे खेळण्याची शक्यता कमीच आहे.शमी आणि बुमराह यांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. स्कॉटलंडचा यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसने न्यूझीलंड विरोधातील सामन्यात म्हटले होते. पूर्ण भारत त्यांचे समर्थन करत आहे. न्यूझीलंडने स्कॉटलंडला १६ धावांनी पराभूत केले होते. स्कॉटलंड जिंकला असता, तर भारताचा मार्ग सोपा झाला असता.