शारजा : वर्णद्वेषाविरुद्ध मोहिमेला पाठिंबा देण्यास इन्कार करीत, मागच्या सामन्यातून बाहेर बसलेला क्विंटन डिकॉक श्रीलंकेविरुद्ध आज शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात द.आफ्रिकेकडून मैदानावर दिसेल का, याबाबत उत्सुकता आहे.
विंडिजविरुद्ध गुडघ्यावर न बसल्यामुळे मला वर्णद्वेषी संबोधण्यात आल्यामुळे फार त्रास झाला, असे त्याने म्हटले होते. द.आफ्रिकेने तो सामना आठ गड्यांनी जिंकला. डिकॉकच्या पुनरागमनामुळे फलंदाजी भक्कम होईल, शिवाय मोठी खेळी करून डिकॉक टीकाकारांना चोख उत्तर देऊ शकेल. कर्णधार तेम्बा बावुमा याने दोन सामन्यांत क्रमश: १२ आणि २ धावा केल्या. रीजा हेंड्रिक्स, रासी वान डर डुसेन, एडेन मार्कराम आणि विश्वासाचा डेव्हिड मिलर हे सर्व जण धावा काढण्यात सक्षम आहेत.
तथापि श्रीलंकेचे फिरकीपटू वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्ष्णा यांच्यापासून त्यांना सावध राहावे लागेल. द.आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विंडिजविरुद्ध दमदार कामगिरी केली होती. वेगवान ड्वेन प्रिटोरियस याने तीन गडी बाद केले, तर डेथ ओव्हरमध्ये कॅगिसो रबाडा आणि एन्रिच नोर्खिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फिरकीपटू तबरेज शम्सी आणि केशव महाराज हेही धावा रोखण्यात तरबेज आहेत.
श्रीलंका संघ ऑस्ट्रेलियाकडून सात गड्यांनी पराभूत झाला. तो पराभव विसरून चरिथ असलंका, कुसाल परेरा, सलामीवीर पथूम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांना धावा काढाव्या लागतील. वानिंदु हसरंगा आणि भानुका राजपक्षे यांचे योगदान सामन्यात निर्णायक ठरेल. वेगवान गोलंदाजीत चमिका करुणारत्ने, दुशमंत चमीरा आणि लाहिरू कुमारा यांच्यावर गडी बाद करण्याची जबाबदारी असेल.
-डिकॉकने गुरुवारी गुरुवारी खेद व्यक्त करीत, यापुढील सामन्यांसाठी आपण उपलब्ध राहणार असल्याचे म्हटले होते. गुडघ्यावर बसल्याने अन्य लोकांना प्रेरणा मिळत असले, तर आपल्याला काही अडचण नाही.
सामना : दुपारी ३.३० पासून