T20 World Cup 2021: पाकिस्तानी संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडला १९व्या षटकात हसन अलीकडून मिळालेल्या जीवदानानं पाकिस्तानचा घात केला. या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) याच्यावर टीका करण्यात आली. त्याच्या बचावात पत्नी सामिया सोशल मीडियावर धडाधडा बोलली. काही दिवसांपूर्वी समिया आरझू ( SamiyaArzoo) या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तानी चाहत्यांना तिनं खडेबोल सुनावले होते. पण, आता त्यात ट्विस्ट आला आहे.
ते ट्विट काय होतं अन् आता सामिया काय म्हणते?
- सामियानं ट्विट केलं की,'' मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आवाहन करू इच्छिते की, त्यांनी पाकिस्तानी फॅन्सकडून आमच्या कुटुंबियांवर होणाऱ्या टीकांवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी. पाकिस्तानी चाहत्यांचा राग मी समजू शकते, परंतु जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे.''
- ''अनेक पाकिस्तानी चाहत्यांना असं वाटतं की मी भारतीय एजंट/पनवती आहे, त्याचे मला खूप वाईट वाटते. पाकिस्तानी संघानं संधी गमावली, हार पत्करली याचे हसन अलीची पत्नी म्हणून मलाही वाईट वाटतं. पण, सामन्यानंतर आम्हाला जीवेमारण्याच्या धमक्या मिळू लागल्या,''असंही तिनं लिहिलं.
- ''काही निलाजरे चाहते आमच्या लहान मुलीलाही टार्गेट करत आहेत आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. जर मला व कुटुंबियांना सुरक्षिततेची हमी मिळणार नसेल, तर मी माझ्या माहेरी ( हरयाणा) कुटुंबियांकडे निघून जाईन. मी डॉ. जयशंकर यांनाही एक भारतीय म्हणून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करते,''असेही ट्विट करत तिनं भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडे विनंती केली.
- ती पुढे लिहिते,''मी पाकिस्तानच्या लोकांना नम्रपणे आवाहन करते की, मला भारतीय म्हणून अभिमान आहे. मी R&W agent नाही आणि माझा पती हसन अली हा शिया आहे म्हणून त्यानं झेल सोडला, असे तर्क लावू नका. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटूद्या आणि हल्ले करणे थांबवा.''
आता सामियानं तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात ती म्हणते, माझ्यानावानं एका ट्विट अकाऊंटवरून बरेच ट्विट झाले, परंतु ते अकाऊंट फेक आहे. हसन आणि माझी मुलगी यांना पाकिस्तानी लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेलेली नाही. या सर्व अफवा आहेत. उलट ते आम्हाला सपोर्ट करत आहेत. माझं कोणतंच ट्विटर अकाऊंट नाही आणि त्यामुळे त्या चर्चांवर विश्वास ठेऊ नका.