महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना त्याचा फायदा होताना दिसत आहे. २००७मध्ये टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्यानंतर २०२१मध्येही हाच करिष्मा होईल, असे स्वप्न चाहत्यांना पडत आहे. त्यामागचं कारणही महेंद्रसिंग धोनी आहे. टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आज भारतीय संघ दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) संघात असूनही त्याच्या जागी विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करावे लागले. धोनीनं सीमारेषेपार रिषभसाठी विशेष वर्ग भरवला होता आणि माजी कर्णधार यष्टिरक्षकाला महत्त्वाच्या टीप्स देताना दिसला.
धोनीनं यावेळी पंतकडून स्टम्पिंग्सचा सराव करून घेतला, काही बेसिक ट्रेनिंगही करून घेतले. धोनीनं भरवलेल्या या विशेष वर्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी रिषभता सज्ज करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.