T20 World Cup 2021, Sachin Tendulkar : हा सामना आयुष्यात येणाऱ्या अशा लढतींपैकी एक होता की, जिथे तुमचे सर्व प्रयत्न फसतात, असे मत महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केले. भारतील संघाला रविवारी न्यूझीलंडनं ८ विकेट्स व ३३ चेंडू राखून पराभूत केलं आणि आता विराट कोहली अँड कंपनी स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्यास भाग पाडले, त्यांनी एकेरी धाव घेऊच दिली नाही आणि भारतीय गोलंदाजांना तसे जमले नाही, असे मत सचिननं व्यक्त केलं.
''हा भारतीय संघासाठी आव्हानात्मक दिवस होता, परंतु असे दिवस कधीकधी वाट्याला येतात. जेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करूनही हाती काहीच लागत नाही. खरं म्हणायचं तर या सामन्यावर अधिक बोलण्यासारखं काहीच नाही. फक्त आशा करतो की, येणाऱ्या पुढील सामन्यांत टीम इंडियाकडून दमदार खेळ पाहायला मिळेल,''असे सचिन म्हणाला. ''भारतीय संघ पकडापकडीचा खेळ करतोय असे वाटले. न्यूझीलंडनं निर्विवाद वर्चस्व गाजवले. किवी गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना जखडून ठेवले होते, त्यांना एकेरी धाव घेऊच देत नव्हते आणि त्यामुळे मोठे फटके मारणे भाग पडले. तसा खेळ भारतीय गोलंदाजांकडून झाला नाही,''हेही तो म्हणाला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या रणनितीचं कौतुक करताना सचिननं पुढे सांगितले की,''पहिल्या चेंडूपासून, क्षेत्ररक्षण लावण्यापर्यंत आणि गोलंदाजांचा सुरेख वापर, किवींची रणनिती चोख होती. पहिल्या सहा षटकांत आपल्या २ बाद ३५ धावा झाल्या होत्या. पाच षटकांत २० धावा आलेल्या आणि अॅडम मिल्नेच्या एका षटकात १५ धावा आल्या. माझ्यासाठी ६ ते १०व्या षटकातील खेळ हा सामन्यातील महत्त्वाचा टप्पा होता. त्या २४ चेंडूंत आपण १३ धावा करून १ विकेट गमावली. पटापट विकेट गेल्यानंतर मैदानावरील जोडी भागीदारी करण्याचा प्रयत्न करते, परंतु एकेरी धावही मिळत नसल्यावर त्यांना मोठे फटके मारणे भाग पडते. रोहित व विराट तेच करण्याच्या प्रयत्नात बाद झाले.''
पाहा व्हिडीओ..