T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तान संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर पहिल्या विजयाची नोंद केली. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानला १० विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला. शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीलाच धक्के दिल्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं १५१ धावा केल्या. पण, पाकिस्तानला विजय मिळवण्यापासून रोखण्यासाठी त्या पुरेशा ठरल्या नाही. या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्यावर नेटिझन्सकडून खालच्या पातळीवर टीका होऊ लागली. क्रिकेट चाहत्यांच्या या वागणुकीवर अनेकांनी टीका केली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्लाह ( Omar Abdullah ) यांनी टीम इंडियावर निशाणा साधला.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू #BlackLiveMatter मोहिमेला पाठिंबा देताना गुडघ्यावर बसले होते. पण, सामन्यानंतर शमीवर हीन दर्जाची टीका होऊनही भारतीय संघातील एकाही खेळाडूनं जाहीरपणे त्याला पाठिंबा दिलेला नाही किंवा घडत असलेल्या प्रसंगाचा निषेधही केलेला नाही. असा आरोप करताना अबदुल्लाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ( JKNC) चे नेते ओमार अब्दुल्लाह यांनी भारतीय संघावर टीका केली. ते म्हणाले, काल पराभूत झालेल्या ११ खेळाडूंपैकी एक मोहम्मद शमी होता. हा सामना खेळणारा तो एकमेव खेळाडू नव्हता. #BlackLiveMatter साठी टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, परंतु संघातील खेळाडूवर खालच्या दर्जाची टीका होत असताना त्याच्यामागे कुणीच उभा राहिलेला नाही.