दुबई - आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये काल वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सुपर १२ फेरीतील लढतीत एक मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना डावातील २० व्या षटकात पाकिस्तानी पंच अलीम दार एकाच चेंडूवर दोनवेळा बालंबाल बचावले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच पंचांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
ही घटना वेस्ट इंडिजच्या डावातील २० व्या षटकात घडली. अखेरच्या षटकामध्ये कायरन पोलार्ड फलंदाजी करत होता. पोलार्डने प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर एक सरळ फटका मारला हा चेंडू थेट पांचांच्या दिशेने गेला. पंच अलीम दार यांनी खाली वाकत स्वत:चा बचाव केला. मात्र या प्रयत्नात ते खाली पडले. हा चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षक रासी व्हॅन दुसॉ याने चेंडू अडवून थ्रो केला. हा थ्रोसुद्धा दार यांच्या दिशेने आला. मात्र सतर्क असलेल्या दार यांनी पुन्हा एकदा स्वत:चा बचाव केला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने २० षटकांमध्ये ८ बाद १४३ धावा बनवल्या होत्या. चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने आठ विकेट्स राखत या सामन्यात सहज विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी प्रभावी ठरली होती.
दरम्यान, २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही अलीम दार यांच्यासोबत अशी मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली होती. त्यावेळी भारत आणि नामिबिया यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात सचिन तेंडुलकरने १५२ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यावेळी सचिनने लगावलेला एक स्ट्रेट ड्राईव थेट अलीम दार यांच्या दिशेने गेला होता. तेव्हा गोळीसारख्या सुसाट येणाऱ्या चेंडूवर दार यांनी कसाबसा आपला बचाव केला होता.