T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सलामीवर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी Black Live Matter चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सर्व खेळाडू गुडघ्यावर टेकून बसले होते. पण तसं करण्यास क्विंटन डी कॉकनं नकार दिला होता. यासाठीच त्यानं सामना सुरू होण्याआधीच अंतिम ११ जणांच्या यादीतून आपलं नाव देखील मागे घेतलं होतं. सामना खेळण्यास त्यानं नकार दिला होता. पण आता आपण केलेल्या कृतीची लाज वाटत असून त्यानं सहकारी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे.
Black Live Matter या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं प्रत्येक सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना गुडघे टेकावे लागतील अशा सूचना दिल्या होत्या. पण क्विंटन डॉ कॉकनं क्रिकेट बोर्डाच्या सूचनेचे पालन करण्यास नकार दिला आणि सामन्यातून माघार घेतली होती. पण आता त्यानं आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली असून पुढील सामन्यात गुडघ्यावर टेकून बसण्यास कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. "खेळाडूंनी गुडघे टेकल्यानं जागरुकता पसरत असेल आणि कृष्णवर्णीयांचं आयुष्य अधिक चांगलं होत असेल तर त्याचा मला आनंदच होईल", असं विधान डीकॉकनं केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं डी कॉकनं पाठवलेला लेखी माफीनामा ट्विट केला आहे. "मला माझे संघातील सहकारी आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची माफी मागायची आहे. मला तो मुद्दा बनवायचा नव्हता. माझ्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि या देशासाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा दुसरे काहीच महत्त्वाचे वाटत नाही. मला माझ्या देशासाठी पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे. मला वर्ल्डकप जिंकायचा आहे. एक खेळाडू म्हणून मला माझ्या जबाबदारीची कल्पना आहे. वर्णद्वेषाच्या विरोधात उभं राहणं हे काय असतं याचीही मला कल्पना आहे. माझ्या गुडघ्यावर बसण्याने लोक शिक्षित होत असतील तर मला यापेक्षा जास्त आनंद होणार नाही", असं डी कॉकनं म्हटंल आहे.
क्विंटन डी कॉक यानं गुडघ्यावर बसून Black Live Matter चळवळीला पाठिंबा न दिल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा चांगलाच संताप झाला होता. क्रिकेट बोर्ड डी कॉकवर कारवाईच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे क्विंटन डी कॉकचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर देखील संपुष्टात आलं असतं पण आता त्यानं माफीनामा सादर केल्यानं या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
Web Title: t20 world cup 2021 Quinton de Kock apologises will take the knee Black Lives Matter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.