T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा पाकिस्तानच्या संघानं भारतावर सहज विजय प्राप्त करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी पाकिस्तानच्या संघाचं कौतुक देखील केलं. तर अनेकांनी भारतीय संघाची खिल्ली उडवली. पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण आता यात एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. पाकिस्तानच्या संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन आणि भारतीय संघाची खिल्ली उडवल्यामुळं एका पतीनं आपल्याच पत्नीविरोधात पत्नी विरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
पाकिस्तानच्या विजयाचं सेलिब्रेशन करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारांकडून कठोर कारवाई केली जात आहे. ज्यानंतर असं कृत्य करणाऱ्यांविरोधात कायदेशीरपद्धतीनं कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आता अशाच पद्धतीचं एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात समोर आलं आहे. रामपूरच्या अजीम नगर येथील रहिवासी ईशान मियाँ दिल्लीत काम करतात. तर त्यांची पत्नी राबिया शमसी या रामपूरमध्ये आपल्या माहेरी राहते. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभव झाला. पती ईशान आपल्या मित्रांसोबत भारत-पाकिस्तान सामना पाहत होता. पण भारताच्या पराभवामुळे तो पुरता निराश झाला. दुसरीकडे त्याच्या पत्नीनं पाकिस्तानच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं आणि पाकिस्तान झिंदाबाद असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं. ईशान यांची पत्नी इथवरच थांबली नाही. तर तिनं भारतीय संघातील खेळाडूंबाबत आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केला. पत्नीच्या अशा धक्कादायक कृतीनं ईशान यांची प्रतिमा त्याच्या मित्र परिवारामध्ये खूप वाईट झाली होती.
पती ईशान यांनी अखेर पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. रामपूरला पोहोचून पतीनं पोलीस अधिक्षकांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पती ईशान मियाँ यांच्याकडून आपल्याच पत्नी विरोधात कायदेशीररित्या तक्रार दाखल करुन घेण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाची आणखी बाजू देखील समोर आली आहे. पती आणि पत्नी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात यााआधी देखील एक तक्रार दाखल आहे. हुंडाबळीचं प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळेच पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीनं ही तक्रार दाखल केली असल्याचं बोललं जात आहे.