मुंबई - शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश झाल्याने आता हार्दिक पांड्या हा टी-२० विश्वचषकामध्ये गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हार्दिक पांड्या टी-२० विश्वचषकामध्ये केवळ फलंदाजी करणार आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने दोन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा रिपोर्ट घेतला होता. त्यानंतर मेडिकल टिमने याची माहिती बीसीआयला दिली होती. त्यानुसार पांड्या या विश्वचषकामध्ये गोलंदाजी करण्याची शक्यता नाही आहे. मेडिकल टीमने दिलेल्या या माहितीमुळे बीसीसीआयला टी-२० विश्वचषकासाठीच्या संघामध्ये बदल करणे भाग पडले आहे. (T20 World Cup 2021)
इनसायडस्पोर्टला बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एकाने याबाबतची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, हे स्पष्ट आहे की, हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकणार नाही. तो विश्वचषकामध्ये फलंदाज म्हणून खेळणार आहे. स्पर्धेदरम्यान, तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला तर त्याला गोलंदाजी करता येईल. मात्र सध्यातरी त्याला गोलंदाजी करता येणे शक्य नाही. आम्हाला अक्षर पटेलबाबत वाईट वाटतं. मात्र संघामध्ये संतुलन साधण्यासाठी अक्षरला शार्दुल ठाकूरसाठी वाट मोकळी करावी लागली.
निवड समितीने एक दिवसापूर्वीच अक्षर पटेलच्या जागी १५ सदस्यीय संघामध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला स्थान देण्यात आले होते. अक्षर पटेलला संघाबाहेर काढण्यासाठी त्याची कामगिरी नाही तर हार्दिक पांड्याची सध्याची तंदुरुस्ती कारणीभूत ठरली आहे.
निवड समितीने टी-२० विश्वचषकासाठी जो संघ निवडला आहे त्यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या रूपात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश होता. तर हार्दिक पांड्या हा चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. मात्र हार्दिक पांड्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात एकही चेंडू टाकलेला नाही. त्यामुळे निवड समितीने ऐनवेळी शार्दुलचा भारतीय संघात समावेश केला आहे.
दरम्यान, भारतीय संघात अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आलेला शार्दुल ठाकूर चांगली फलंदाजी करतो. त्यामुळेच त्याला भारतीय संघात प्राधान्याने स्थान देण्यात आले. तर दीपक चहर हा स्टॅडबाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आला आहे.