Join us  

T20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिकेचं पुन्हा बॅड लक, 4 सामने जिंकूनही स्पर्धेतून 'आऊट'

सुपर 12 मध्ये ग्रुप ए. मधील 3 संघ मोठ्या पराभवामुळे उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत. तर, उर्वरीत 3 संघ उपांत्य सामन्याची लढाई लढत होते. मात्र, अखेर उपांत्य सामन्यांतील प्रवेश हा हार-जीतने होणार नसून नेट रेटने झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 2:25 PM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडने पहिले 4 सामने जिंकल्यामुळे नेटरेटमध्ये द. आफ्रिकेपेक्षा इंग्लंडचा संघ सरस ठरला आहे. उपांत्य सामन्यासाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत अंतिम लढाई झाली. त्यामध्ये, द. आफ्रिकेनं 190 धावांचं आव्हान दिलं होतं.

दुबई - यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अतिशय रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच, एकमेकांच्या विजय-पराजयावरच अनेक संघांचे भवतिव्य अवलंबून असल्याचे दिसून येते. स्पर्धेत सुपर 12 मध्ये पहिल्यापासून ग्रुप ए ला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं जात आहे. ग्रुप ए. मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि बांग्लादेशच्या संघांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्याप्रमाणेच अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. 

सुपर 12 मध्ये ग्रुप ए. मधील 3 संघ मोठ्या पराभवामुळे उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत. तर, उर्वरीत 3 संघ उपांत्य सामन्याची लढाई लढत होते. मात्र, अखेर उपांत्य सामन्यांतील प्रवेश हा हार-जीतने होणार नसून नेट रेटने झाला आहे. ग्रुप 1 मधून दोन संघांना उपांत्य सामन्यात प्रवेश देण्यात येणार होता. मात्र, तीन संघांनी 4-4 विजयांसह 8 गुण प्राप्त केले आहेत. मात्र, नेट रेटमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघानेच उपांत्य सामन्यांत प्रवेश मिळवला आहे. तर, तितकेच सामने जिंकणारी दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर झाली आहे. 

इंग्लंडने पहिले 4 सामने जिंकल्यामुळे नेटरेटमध्ये द. आफ्रिकेपेक्षा इंग्लंडचा संघ सरस ठरला आहे. उपांत्य सामन्यासाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत अंतिम लढाई झाली. त्यामध्ये, द. आफ्रिकेनं 190 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, नेटरेटमधील फरकामुळे इंग्लंडला 131 धावांतच रोखणे आवश्यक होतं. मात्र, ते शक्य न झाल्याने द. आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. आजपर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात अनेकदा अशा गणितांनी आफ्रिकेच्या संघाला हुलकावणी दिली आहे. दरम्यान, ग्रुप 1 मधील वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ यापूर्वीच बाहेर पडले आहेत. श्रीलंकेने 2, वेस्टइंडिने 1 आणि बांग्लादेशने 0 सामने जिंकले आहेत. आता, ग्रुप बी मधून उपांत्य सामन्यासाठी कोण येतंय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१द. आफ्रिकाइंग्लंडभारत
Open in App