दुबई : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला इंग्लंड संघ टी-२० विश्वचषकाच्या अ गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज, शनिवारी दोनहात करणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने स्पर्धेत पहिले मोठे आव्हान इंग्लंडपुढे असेल. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले असल्याने गटातील वर्चस्वाची ही लढत असणार आहे.ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध संघर्ष करावा लागला, मात्र काल लंकेवर त्यांनी सहज मात केली. सामन्यात सकारात्मक बाब घडली ती, सलामीची जोडी डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार ॲरोन फिंच यांचे फॉर्ममध्ये परतणे! आक्रमक अर्धशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या वाॅर्नरने इंग्लंडविरुद्ध लढत सोपी असणार नाही, हे मान्य केले. इंग्लंड संघात फलंदाज आणि गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यांचा आत्मविश्वास देखील उंचावलेला आहे. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांसह लेग स्पिनर ॲडम झम्पा यांनी चांगली कामगिरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्क्स स्टोयनिस यांच्याकडूनही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांगला देशवर विजय मिळविताना फारसा घाम गाळला नव्हता. ऑस्ट्रेलियाकडून मात्र त्यांना अवघड आव्हान मिळू शकेल. त्यादृष्टीने ऑफस्पिनर मोईन अली, वेगवान टायमल मिल्स, लेग स्पिनर आदिश रशिद यांना दमदार मारा करावा लागेल.
सामना : सायं. ७.३० पासून