टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये कोण धडक मारणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'अ' गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळतेय, तर 'ब' गटात भारत आणि न्यूझीलंडपैकी कुणाचं नशीब चमकतं, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. गंमतीचा भाग असा की, या चारही संघांना सेमी फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी स्वतःचे सामने जिंकावे लागणारच आहेत, पण दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर यांचं भवितव्य अवलंबून आहे. हेच सगळं समीकरण लक्षात घेऊन, टीम इंडियाचा माजी फलंदाज वासिम जाफरनं एक भन्नाट मीम ट्विट केलंय. 'धम्माल' या कॉमेडी सिनेमातील एका सीनद्वारे त्यानं 'कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं' आहे, हे अत्यंत नेमकेपणाने दाखवलंय.
'अ' गटात सध्या चारही सामने जिंकून इंग्लंड अव्वल क्रमांकावर आहे. आता ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये धडक मारायची असेल, तर त्यांना आज वेस्ट इंडिजला हरवावं लागणार आहे. पण तेवढंच पुरेसं नाही. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावा, यासाठीही कांगारुंना प्रार्थना करावी लागेल. दक्षिण आफ्रिका किरकोळ फरकाने जिंकली, तरी ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होईल. कारण, रन रेटमध्ये ते पुढे आहेत. पण, इंग्लंडविरुद्ध द. आफ्रिकेने मोठा विजय मिळवल्यास त्यांच्यासाठी सेमी फायनलचं दार उघडू शकतं.
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज सामन्याचं LIVE SCORECARD
'ब' गटातील गणित जरा किचकट आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर, टीम इंडियानं अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवल्यानं भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. आता ८ नोव्हेंबरला नामिबियाविरुद्धचा सामना भारताला जिंकावा लागणार आहे. ते फारसं कठीण नाहीए. पण, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात अटीतटीचा सामना व्हायला हवा आणि त्यात अफगाणिस्ताननं बाजी मारायला हवी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना उद्या - ७ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे ८ तारखेच्या भारताच्या सामन्यापेक्षा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याकडेच भारतीय क्रिकेटप्रेमींचं अधिक लक्ष आहे. दरम्यान, पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे.
वासिम जाफरचं मीममध्ये हेच चित्र अगदी मार्मिकपणे मांडलंय. यात, ऑस्ट्रेलियाचं ओझं इंग्लंडच्या खांद्यावर आहे, तर टीम इंडियाची सगळी भिस्त अफगाणिस्तावर आहे. आता, कोण हे ओझं पेलतं आणि कुणाची विकेट पडते, हे लवकरच समजेल.