दुबई : माजी विजेता श्रीलंका संघ टी-२० विश्वचषकात सुपर-१२ साखळीत गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत देणार असून, प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीतील कमकुवत फलंदाजीचा पुरेपूर लाभ घेऊ इच्छितो.
लंकेने २०१४ला स्पर्धा जिंकली होती; पण यंदा त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागला. तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत दाखल होताच या संघाने मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पाच गडी राखून नमविले होते.
दुसरीकडे आतापर्यंत टी-२० विश्वचषक जिंकू न शकलेल्या ऑस्ट्रेलियाला सलामीला द. आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य गाठताना संघर्ष करावा लागला. ३८ धावात तीन फलंदाज गमावल्यानंतर त्यांना अखेरच्या षटकात विजय मिळाला. कर्णधार ॲरोन फिंच भोपळा न फोडता बाद झाला. गेल्या काही महिन्यांपासून तो धावा काढण्यास धडपडत आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांची बॅटदेखील शांत आहे.
श्रीलंकेच्या फिरकीपटूंना खेळायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला धावा काढाव्या लागतील. स्टीव्ह स्मिथ कसा खेळतो, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. चांगली बाब अशी की ग्लेन मॅक्सवेल हा फलंदाजी व गोलंदाजीत उपयुक्त ठरतो. संथ खेळपट्टीवर फिरकीपुढे धावा काढणे कांगारुंना अवघड जाईल.
कांगारुंना फलंदाजीत करावी लागेल सुधारणाऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवातीची नितांत गरज आहे. मात्र कर्णधार ॲरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरत आहे. दोघांपैकी एकाची जरी बॅट तळपली, तर श्रीलंकेला याचा मोठा फटका बसेल. स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून कांगारुंना मोठी अपेक्षा असेल. लंकेची गोलंदाजी काहीशी कमकुवत वाटत असली, तर संथ खेळपट्टीवर त्यांचे फिरकीपटू कांगारुंना अडचणीत आणू शकतील.