मुंबई - टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जबरदस्त खेळ करत आहे. या स्पर्धेत अनेक रंगतदार सामने होत आहेत. नेदरलँड्स, आयर्लंडसारख्या संघांनीही या स्पर्धेत मोठी उलथापालथ घडवली आहे. भारतीय संघाने सध्याच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. मात्र या वर्ल्डकपसाठी संघात समावेश झालेल्या खेळाडूंमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अंतिम संघात स्थान दिलेले नाही. पाहा कोण आहे हा खेळाडू.
टी-२० वर्ल्डकमध्ये भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहे. मात्र या चारही सामन्यात मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला खेळण्याची संधी मिळालेली नाही. हर्षल सध्या अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. धारदार गोलंदाजी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वीचे सराव सामने वगळता त्याला संघाबाहेरच राहावे लागले आहे.
गेल्या एका वर्षात कर्णधार रोहित शर्मा आणि संघव्यवस्थापनाने ज्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकपसाठी तयार केले त्यांच्यामध्ये हर्षल पटेलचं नाव आघाडीवर होते. त्याने अनेकदा भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र आता प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या संघ आराखड्यात त्याला स्थान मिळत नाही आहे. किफायतशीर गोलंदाजी करून विकेट्स मिळवण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये हर्षल पटेलने भेदक गोलंदाजीच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारताच्या गोलंदाजीमध्ये त्याची चार षटके निर्णायक ठरायची. सूर गवसल्यावर तो कुठल्याही संघाची भक्कम फलंदाजी फळी कापून काढतो. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत. तसेच त्यामध्ये त्याने २६ विकेट्स टिपले आहेत.