रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पाकिस्तानची सेमीफायनलला जाण्याची वाट अधिक खडतर झाली आहे. अशा परिस्थितीत या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकनं भारतानं हा सामना जाणूनबुजून गमावल्याचा दावा केला आहे. भारतानं या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत १३४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरच्या नाबाद अर्धशतकी खेळीने त्यांना विजय मिळवून दिला. पाकिस्तान पुढे जावा असं भारताला वाटत नसल्याचं वक्तव्यही यानंतर मलिकनं केलं.
पाकिस्तान पुढे जावा असं भारताला कधीही वाटत नाही असं सलीम मलिकनं न्यूज २४ शी बोलताना सांगितलं. परंतु यावेळी चर्चेत सोबत असलेल्या वाहब रियाझ यानं आपले हात झटकत हे तुमचं मत असू शकतं असं म्हटलं.
“जर टीम इंडियानं चांगली फिल्डिंग केली असती तर त्यांचा पराभव झाला नसता. आज त्यांनी निराशाजनक फिल्डिंग केली. हे कॅच सुटणारे नाहीत. भारत कायमच पाकिस्तानचा विरोधक राहिला आहे. परंतु त्यांनी ज्या प्रकारे फिल्डिंग केली… त्यांनी सुरूवातीला प्रयत्न केले यात काही शंका नाही, जोशही दिसला, परंतु ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग केली मला थोडी शंका आहे त्यांना पाकिस्तान कधीही आवडत नाही,” असंही त्यानं म्हटलं.
सुरूवातीच्या दोन सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा झटका बसल्यानंतर भारताच्या या सामन्यातील विजयाकडून पाकिस्तानला अपेक्षा होत्या. अशा परिस्थितीतच सलीम मलिकचं हे वक्तव्य समोर आलं आहे. जर रविवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला असता तर सेमीफायनला पोहोचण्याची पाकिस्तानची आशा कायम राहिली असती. परंतु आता त्यांचा सर्व खेळ जर तर वर टिकून आहे.