- सुनील गावस्कर
खेळात जय-पराजय होतच असतो, मात्र भारताच्या दारुण पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांचे नेहमीप्रमाणे डोके चक्रावले. धक्कादायी शोक व्यक्त करण्याची ही वेळ नाही. प्रत्येक विजय आणि पराजयानंतर खेळाडूंना धारेवर धरले जाते. यावेळी काही अनुभवी खेळाडू अपयशी ठरले. त्यांच्या कमकुवतपणावर कठोर टीका होत आहे. टी-२० हा तसा तरुणांचा खेळ; पण संघात तरुणाई आणि अनुभव यांचे उत्तम मिश्रणही हवेच असते.
२००७ चा विश्वचषक आठवा. भारत या स्पर्धेत खेळणार होता त्यावेळी कसोटी संघाचा कर्णधार असलेला राहुल द्रविड, अनुभवी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अंग काढून घेत इतर खेळाडूंना निवडण्याची मोकळीक दिली. वाघासारखे क्षेत्ररक्षण करू शकतील असे तरुण खेळाडू निवडण्यावर निवड समितीने भर दिला. या प्रकारात क्षेत्ररक्षण हा महत्त्वाचा पैलू आहे. या विश्वचषकात भारताकडे एकाहून एक सरस असे क्षेत्ररक्षक होते.
प्रश्न असा उपस्थित होतो की, जगातील सर्वांत रोमांचक आणि सर्वोत्कृष्ट लीगचे आयोजक असलेला भारत आयसीसीची स्पर्धा का जिंकू शकत नाही? भारतीय खेळाडूंना अधिक अनुभव आणि एक्सपोजर मिळण्यासाठी इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशाही सूचना येत आहेत. या प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत. इंग्लंडमध्ये जगात सर्वांत लोकप्रिय फुटबॉल लीग आहे; पण त्यांनी एका दशकापेक्षा अधिक काळ लोटूनही विश्वचषक किंवा युरोपियन कप जिंकला आहे का? इंग्लिश खेळाडू युरोपमधील इतर लीगमध्येही खेळतात. त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट लीग असणे किंवा त्या देशाचे खेळाडू इतर लीग खेळणे हे गणित बहुराष्ट्रीय स्पर्धा जिंकेल याची शाश्वती देत नाही. बिग बॅश लीग असूनही ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला होता आणि पीएसएल तसेच इंग्लंडच्या टी-२० लीगने पाकिस्तान किंवा इंग्लंडला नियमितपणे विश्व चॅम्पियन बनविलेले नाही, तरीही मेलबोर्नचे हवामान चांगले राहिल्यास यंदा दोघांपैकी एक चॅम्पियन बनेल.
ऑसीज, किवी, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि इतर देशांचे खेळाडूही आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळतात, पण त्यांचे देश फायनलमध्ये का नाहीत? त्यामुळे कृपया आयपीएलला ‘टार्गेट’ करण्यासाठी भारताच्या पराभवाचा वापर करू नका. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे आणि ती तशीच टिकून राहण्यासाठी भारतीय खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषत: भारतात स्थानिक हंगाम सुरू असताना आमच्या खेळाडूंनी इतर लीग खेळू नयेत. ते इतर लीगमध्ये खेळून जगभर फिरणार असतील तर वर्कलोडचे काय?या स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडला आणि नेदरलॅन्ड्सने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्याचा केलेला करिष्मा पाहिला असेलच. टी-२० सामन्याचे स्वरूप असेच आहे. कोणताही संघ जिंकू शकतो. होय भारत हरला, पण का? तर त्या दिवशी इंग्लंडचा संघ खूप चांगला होता. (टीसीएम)