Join us  

T20 World Cup 2022: इंग्लंड की पाकिस्तान? कोण होणार जगज्जेते! टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज

T20 World Cup 2022 Final, Eng Vs Pak : १९९२ च्या विश्वचषकातील पराभावाचा बदला घेण्याची इंग्लंडला, तर विजयाची पुनरावृत्ती करण्याची पाकिस्तानला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 6:35 AM

Open in App

- अयाज मेमन

२००९चा चॅम्पियन पाकिस्तानची टी-२० विश्वचषकातील मोहीम आश्चर्यकारकपणे १९९२च्या वन डे विश्वचषकासारखीच ठरली. भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभूत होताच पहिल्या आठवड्याअखेर हा संघ बाहेर पडण्याच्या स्थितीत होता. पण नेदरलॅन्डने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच पाकचे नशीब पालटले. १९९२ला असेच पावसाने पाकला तारले होते. यंदा उपांत्य फेरीत बलाढ्य न्यूझीलंडला धूळ चारून दडपणात आम्ही यशस्वी कामगिरी करतो, हे पाकिस्तानने दाखवून दिले.  आता बाबर आझमचा पाकिस्तान १९९२च्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकणार की इंग्लंड बदला घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

१९९२च्या फायनलची पुनरावृत्ती?१९९२ला इंग्लंडला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. तथापि इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ जगज्जेता बनला. बाबर आझमचा संघ भारताला दुसऱ्या उपांत्य लढतीत निर्दयीपणे एकतर्फी नमविणाऱ्या इंग्लंडची शिकार करू शकेल? १९९२ प्रमाणे इंग्लिश खेळाडूंची घोडदौड थांबविण्यासाठी पाकला विशेष कामगिरी करावीच लागेल. उत्कृष्ट रणनीती, सांघिक कामगिरीसह चालून आलेल्या संधीचे सोने करण्याची प्रेरणा जोपासल्यास पाकिस्तान सामन्याचे पारडे स्वत:कडे फिरवू शकेल. १९९२च्या अंतिम लढतीत इम्रान आणि जावेद मियांदाद यांनी फलंदाजीत मोठी भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला होता. त्यामुळे गोलंदाजांना लक्ष्याचा यशस्वी बचाव करता आला. रविवारी बाबर-रिझवान यांच्याकडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा असावी. त्यावेळी इंग्लंडचे फलंदाज विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे ध्यानात येताच वसीम अक्रमने ॲलन लॅम्ब-ख्रिस लुईस यांचा अडथळा सलग चेंडूवर दूर करीत सामना जिंकेपर्यंत चतुरस्र मारा सुरूच ठेवला होता.

सकारात्मक मानसिकता, आक्रमक देहबोली महत्त्वाचीयंदाच्या विश्वचषकात बरेच अपसेट घडले. अनेक संघांनी पॉवर प्लेमध्ये सामने जिंकले किंवा हरले. त्यामुळे पाकिस्तानला सलामीवीर बाबर- रिझवान यांच्याकडून शानदार सुरुवात व्हावी तसेच शाहीन शाह आफ्रिदी याने झटपट गडी बाद करीत यश मिळवून द्यावे अशी अपेक्षा असेल. फायनलमध्ये इंग्लंडचा राशिद अली आणि पाकिस्तानचा शादाब खान या लेगस्पिनर्सचा मोठा प्रभाव असेल, असे वाटते. सकारात्मक मानसिकता आणि आक्रमक देहबोली, खेळपट्टी आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तसेच परिस्थितीशी लवकर एकरूपता साधणे  या गोष्टी फायनलमध्ये निर्णायक सिद्ध होतील. इंग्लंडने भारताविरुद्ध जी वृत्ती दाखविली, त्यापासूनही बोध घेता येईल. स्वत:वर विश्वास राखण्यापेक्षा कुठलीही महत्त्वपूर्ण आणि मोठी गोष्ट नसावी.

इंग्लंडचे पारडे जडगुरुवारी भारताचा दारुण पराभव करणारा इंग्लंड अजिंक्य वाटतो. या संघात तुफान फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर, अनेक मॅचविनर फलंदाज, वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत. उत्कृष्ट आक्रमणाच्या सोबतीला तरबेज क्षेत्ररक्षक आहेत. जेतेपदाचे लक्ष्य गाठण्यासाठी संघ संयोजन तयार आहे. मार्क वूड आणि डेव्हिड मलान तंदुरुस्त असल्यास अंतिम एकादश आणखी बलाढ्य होईल.पावसाचे सावट...फायनलमध्ये रविवारी आणि राखीव दिवस असलेल्या सोमवारी पावसाचे सावट असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. तथापि, जगातील दोन सर्वोत्तम टी-२० प्रतिभा असलेले संघ आतापर्यंत सर्वांत रोमहर्षक ठरलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमने-सामने येणार असल्याने हा सामना पावसात धुतला जाणार नाही, अशी आशा बाळगूया.

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२इंग्लंडपाकिस्तान
Open in App