T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू आहे आणि सुपर १२ मध्ये पोहोचण्याची चुरस रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या फेरीत ब गटात चारही संघांनी प्रत्येकी दोन गुण कमावले आहेत आणि शनिवारचा दिवस त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. अ गटात श्रीलंकेच्या संघावर स्पर्धेबाहेर फेकले जाण्याची टांगती तलवार आहे आणि आज त्याचा फैसला होईल. नेदरलँड्सने या गटात ४ गुणांसह सुपर १२मधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. याच गटात यूएईचे आव्हान संपुष्टात आले आहे आणि आज ते नामिबियाविरुद्ध औपचारिक सामना खेळतील, परंतु यूएईच्या विजयावर श्रीलंकेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशात ऑस्ट्रेलियातून चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी तीन संघांना आपापल्या संघात बदल करावा लागला. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज रिसे टॉप्ली याला घोट्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात टॉप्लीला ही दुखापत झाली. त्याच्याजागी टायमल मिल्सचा मुख्य संघात समावेश केला गेला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मध्ये मिल्सने इंग्लंडच्या प्रवासात महत्त्वाचा वाटा उचलला होता, परंतु त्याला तेव्हा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.
आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेलाही महत्त्वाच्या लढतीपूर्वी दुखापतीचा फटका बसला. दुष्मंथा चमिराला हॅमस्ट्रींगमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी कसून रजिथाचा समावेश झाला. हा एकच धक्का त्यांना बसलेला नाही, तर आघाडीचा फलंदाज दानुष्का गुणथिलका यानेही माघार घेतलीय. आशेन बंदाराचा त्याच्याजागी समावेश केला गेला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात चमिराला दुखापत झाली. यूएईच्या संघातही दुखापतीमुळे बदल करावा लागलाय. अष्टपैलू खेळाडू जावर फरीदने पायाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्या जागी फहाद नवाज खेळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"