नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकिकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत. तर दुसरीकडे सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघ आमनेसामने आहेत. खरं तर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी आगामी विश्वचषकाबद्दल आपापली मतं मांडली आहेत. पण या विश्वचषकासाठी भारतीय संघ दावेदार नसल्याचे भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले आहे. भारताचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकात दोनवेळा हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा दोन्हीही संघानी 1-1 विजय मिळवून एकमेकांना कडवे आव्हान दिले होते.
दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने 10 गडी राखून भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आगामी विश्वचषकातून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल. मात्र अशातच भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी एक मोठे विधान केले आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेचा दावेदार असल्याचे मला वाटत नाही असे त्यांनी म्हटले. "मला वाटत नाही आगामी विश्वचषकासाठी भारत फेव्हरेट असेल. मागील 10 वर्षांत पहिल्यांदाच असे झाले आहे की भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेसाठी फेव्हरेट मानले जात नाही." अशा शब्दांत हर्षा यांनी भारतीय संघ या विश्वचषकासाठी कमकुवत असल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघात दुखापतीची मालिकाविश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. तर भारताचा न्यूझीलंडविरूद्ध होणारा दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ आता थेट रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध मैदानात असणार आहे. खरं तर विश्वचषकापूर्वी काही स्टार भारतीय खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारत आगामी स्पर्धा खेळणार आहे. बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान मिळाले आहे, त्याने पहिल्या सराव सामन्यात कमाल करून एकाच षटकांत 4 बळी पटकावले होते. तसेच राखीव खेळाडू म्हणून निवड झालेला दीपक चहर देखील दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकला आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"