T20 World Cup 2022 Explainer: येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये T20 विश्वचषक 2022 होणार आहे. मागच्या वर्षीचा T20 विश्वचषक UAE आणि ओमानमध्ये खेळला गेला होता, त्यात ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन बनला होता. यंदा त्यांच्याच भूमीत T20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून सामने सुरू होणार असले तरी परंतु 'सुपर-१२'चे सामने २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
१६ संघांचा समावेश, अशी रंगणार स्पर्धा...
T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. ही टूर्नामेंट एकूण तीन टप्प्यात खेळवली जात आहे. राऊंड 1, सुपर-12 आणि प्ले-ऑफ सामने असे तीन टप्पे असतील. यातील ८ संघ सुपर-12 साठी थेट पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करतील. पात्रता फेरीत ४-४ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आपापल्या गटातील टॉप-२ संघ सुपर-12 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-12 मध्ये ६-६ संघांचे दोन गट असतील, ज्यामध्ये त्यांच्या गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तेथे प्लेऑफ ला सुरूवात होईल. त्यांच्यातून सर्वोत्तम दोन संघ फायनल खेळतील.
राउंड-1ग्रुप A: श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामीबियाग्रुप B: आयरलँड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज
सुपर-12ग्रुप 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ग्रुप-A विजेता, ग्रुप-B उपविजेताग्रुप 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता
पॉईंट्स कसे दिले जाणार?
T20 विश्वचषकासाठी पॉइंट्स टेबल सिस्टीम जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण मिळतील आणि सामना बरोबरीत किंवा रद्द झाल्यास संघांमध्ये एक गुण विभागला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांचा नेट रन-रेट पाहून आणि त्यांचा आमने-सामने रेकॉर्ड पाहून निर्णय घेतला जाईल.
एकूण ७ मैदानांवर होणार सामने
T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण ४५ सामने आयोजित केले जाणार आहेत. होबार्ट आणि गिलॉन्गमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. तर सिडनी, मेलबर्न, पर्थ, अडलेड आणि ब्रिस्बेन येथे सुपर-12 स्टेजचे सामने होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने अॅडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहेत. तर, अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होईल.
T20 विश्वचषकातील भारताचे सामने
भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरला भारताचा सामना पात्रता फेरीतील अ गटातील उपविजेत्या संघाशी होणार आहे. त्यानंतर ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि २ नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना होईल. त्यानंतर सुपर-12 चा शेवटचा सामना ६ नोव्हेंबरला ग्रुप-ब च्या विजेत्या संघाशी होईल.
भारतीय वेळेनुसार (IST) भारताचे सामने-
• भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर, दुपारी १.३० वाजता (मेलबर्न)• भारत विरुद्ध गट अ उपविजेता, २७ ऑक्टोबर, दुपारी १२.३० वाजता (सिडनी)• भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, दुपारी ४.३० (पर्थ)• भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, दुपारी १.३० वाजता (अॅडलेड)• भारत विरुद्ध गट ब विजेता, ६ नोव्हेंबर दुपारी १.३० वाजता (मेलबर्न)
कुठे पाहाल सामने?
भारतातील T20 विश्वचषकाचे सामने स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित केले जातील. त्याच वेळी, हॉट स्टार आणि वेबसाइटवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या शिवाय दूरदर्शन भारताचे सर्व सामने, उपांत्य फेरी, अंतिम सामने प्रसारित केले जातील. तसेच Lokmat.com वर तुम्हाला T20 विश्वचषकाशी संबंधित सर्व बातम्या, मनोरंजक आकडेवारी वाचायला मिळेल.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ-रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग
स्टँड-बाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर