T20 World Cup 2022, IND vs ENG : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. १० नोव्हेंबरला एडिलेड येथे होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय संघ सोमवारी एडिलेड येथे दाखल झाला. मंगळवारी सकाळच्या सत्रात कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापत झाल्याने भारतीय चाहत्यांची धाकधुक वाढली होती, परंतु प्राथमिक उपचार नंतर पुन्हा सराव केला. २००७नंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण करेल अशी आशा सर्वांना आहे.
त्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) रोहित व विराट कोहली ( Virat Kohli) हे सीनियर सदस्य पुढाकार घेत आहेत. मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही संघातील प्रत्येक सदस्याची ते काळजी घेत आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. भारतीय संघ मेलबर्न ते सिडनी आणि एडिलेड ते पर्थ असा प्रवास केला आहे. मेलबर्नवर पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सिडनी, पर्थ, एडिलेड व मेलबर्न असा प्रवास केला. आता उपांत्य फेरीचा सामना एडिलेड येथे होणार आहे. या प्रवासादरम्यान द्रविड, रोहित, विराट भारतीय खेळाडूंची काळजी घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सततचा सराव, प्रवास यामुळे भारतीय गोलंदाज अधिक थकत आहेत आणि त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी याकरिया द्रविडसह सीनियर खेळाडूंनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संघातील या सीनियर खेळाडूंनी प्रवासादरम्यान स्वतःचं बिझनेस क्लासचं सीट अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांना दिले. ''या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी गोलंदाजांवरील वर्क लोड आणि सततचा प्रवास यावर आम्ही चर्चा केली होती. सराव, सामने आणि प्रवास याचा ताण गोलंदाजांच्या पायावर पडतो, त्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती हवी आहे,''असे सपोर्ट स्टाफच्या सदस्याने सांगितले.
ICC च्या नियमानुसार स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ संघांतील प्रत्येकी ४ खेळाडूंनाच विमानाचे बिझनस क्लास तिकीट दिले जाते. ही आलिशान सुविधा संघातील मुख्य प्रशिक्षक व सिनियर खेळाडूंसाठी असते. मात्र, भारताच्या प्रशिक्षक व सीनियर खेळाडूंनी त्या तिकीट्स भारतीय गोलंदाजांना देण्याचा निर्णय घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"