पर्थ - टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. आता रविवारी होणाऱ्या लढतीत टीम इंडियाची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्टी ओळखल्या जाणाऱ्या पर्थ येथे खेळवला जाणार आहे. पर्थवर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर टीम इंडियाची कसोटी लागू शकते. मात्र या सामन्यात पाऊस व्हिलन ठरू शकतो. या वर्ल्डकपमध्ये अनेक सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे या सामन्यातही पाऊस व्हिलन ठरणार का? अशी चिंता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
अशा परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे या वर्ल्डकममध्ये पर्थमध्ये दोन सामने खेळवले गेले आहेत. तसेच दोन्ही सामन्यांचा निकाल लागला आहे. त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. पर्थमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.
आता या सामन्यातील हवामानाचा अंदाज समोर आला आहे. त्यानुसार सामन्यावेळी पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही आहे. मात्र सामन्यापूर्वी दोन तास आधी पाऊस पडू शकतो. त्याशिवाय सामन्यादरम्यान कडाक्याची थंडी पडू शकते. सामन्यादरम्यान तापमान १३ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. मैदानात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हवेचा वेगही ५५ किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. अॅक्यूवेदर.कॉमने ही माहिती दिली आहे.
या सामन्यात भारताचा संभाव्य संघ असा असू शकतोके. एल. राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी