मेलबर्न-
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक मेजवानीच असते. त्यातही जर ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा असेल तर सामन्याला एक वेगळंच वलय प्राप्त होतं. भारतीयांनी काल मेलबर्नच्या क्रिकेट स्टेडियमवर काल अशाच एका ऐतिहासिक सामन्याची अनुभूती घेतली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानवर विजय प्राप्त केला आणि यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप मोहिमेची विजयानं सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानवर ४ गडी राखून विजय प्राप्त केला. तर हार्दिक पंड्यानं १७ चेंडूत ४० धावा करत मोलाचं योगदान दिलं.
एकीकडे भारताने उडवला पाकचा धुव्वा तर दुसरीकडे पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला- जय श्रीराम!
शेवटच्या ३ षटकांत भारताला विजयासाठी ४८ धावांची गरज असताना कोहलीनं आपल्या भात्यातून तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा पेश करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. शेवटचं षटक रोमांचक ठरलं. ६ चेंडूत १६ धावांची गरज होती आणि या षटकात भारतानं दोन फलंदाज गमावलं. अखेरच्या चेंडूवर १ धाव हवी असतान आर.अश्विननं विजयी चौकार खेचला आणि भारतानं सामना जिंकला.
नेदरलँड्सने पोटात गोळा आणलेला; अनुभवाच्या जोरावर बांगलादेशने सामना जिंकला, इतिहास घडविला
पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ३१ धावा अशी बिकट अवस्था होती. अशा कठीण काळात विराट कोहलीनं मैदानात जम बसवून आपलं कौशल्य सिद्ध करुन दाखवलं. कालच्या विजयाच्या आठवणी क्रिकेट रसिकांच्या मनात आहेत. चाहते वारंवार कालच्या सामन्याचे हायलाइट्स पाहात आहेत. ट्वेन्टी-२० सामना असावा तर असा, अशीच प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढत अनुभवता येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं समीकरण समजून घेणं यासाठी खूप महत्वाचं आहे.
आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढत पुन्हा पाहायला मिळू शकते का? तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. पण यासाठीची शक्यता फारच कमी आहे. कारण भारत-पाकिस्तान सामना पुन्हा अनुभवयचा असेल तर दोन्ही संघांना फायनलमध्ये प्रवेश करावा लागेल. म्हणजेच आता अंतिम सामन्यातच दोघांची लढत होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांचा 'ग्रूप-बी'मध्ये समावेश आहे. या ग्रूपमध्ये श्रीलंका, द.आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. या गटातून भारत आणि पाकिस्तान टॉप-२ संघ राहिले तर त्यांना उपांत्य फेरी गाठता येईल. पण उपांत्य फेरीत दोन्ही संघांसमोर 'ग्रूप-ए' मधील टॉप-२ संघांचं आव्हान असेल. त्यामुळे जर उपांत्य फेरीतही भारत-पाकिस्तान यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली तर अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान थरार पाहायला मिळू शकतो.
२००७ सालच्या वर्ल्डकपची पुनरावृत्ती होणार?पहिल्या वहिल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता. त्यावेळी भारत, पाकिस्तान एकाच ग्रूपमध्ये होते. साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ८ मध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरी गाठली. तर पाकिस्ताननं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असा अंतिम फेरीतील सामना रंगला. या रोमांचक लढतीत भारतीय संघानं पाकिस्तानवर विजय प्राप्त करत पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली होती.