Indian captain Rohit Sharma, pre-match press conference: भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला अवघ्य २४ तासांवर येऊन ठेपला आहे. मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये बाबर आजम अँड कंपनीने भारतावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर IND vs PAK यांच्यात आशिया चषकातील दोन सामन्यांत १-१अशी बरोबरी राहिली. आता मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत आणि त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पाकिस्तानच्या गोलंदाजीचे कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्याने आव्हानासाठी आम्ही तयार असल्याचेही ठणकावून सांगितले.
रोहित म्हणाला, ''मागील वर्षभरातील आमची कामगिरी सुधारली आहे आणि मागच्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या चुका आम्ही हेरल्या आणि त्यापैकी बऱ्याच सुधारण्यात आम्ही यश मिळवले आहे. एक संघ म्हणून काय करायला हवं, हे आम्ही जाणतो. मोहम्मद शमी अनुभवी गोलंदाज आहे आणि तो यापूर्वीही वर्ल्ड कप खेळला आहे. जसप्रीत बुमराह जेव्हा दुखापतग्रस्त झाला, तेव्हा आम्हाला अनुभवी गोलंदाज हवा होता. शमी पूर्णपणे तयार आहे.''
''मोठ्या दोऱ्यासाठी तयारीही तितकीच तगडी करायला हवी. संघातील बरेच खेळाडू SENA देशांमध्ये खेळलेले नाहीत. पण, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि मागच्या वर्ल्ड कपनंतर ही प्रक्रिया सुरू झालीय. तुम्हाला मॅच सोबतच सहजगत्या असायला हवं. ऑस्ट्रेलियात या महिन्यात फारसे क्रिकेट खेळले गेले नाही, पण आमच्याकडे डाटा आहे. प्लेइंग इलेव्हनसाठी मला पर्याय ठेवायला हवेत. नाणेफेक ही महत्त्वाची आहे. मेलबर्नच्या हवामानाबद्दल मला कल्पना आहे आणि ते सातत्याने बदलतंय. तरीही आम्हाला ४० षटकांचा विचार करूनच मैदानावर उतरावे लागेल आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. कमी षटकांच्या सामन्यासाठीही आम्ही तयारी केलीय,''असेही रोहित म्हणाला.
उद्याच्या सामन्यात सर्व १५ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत, असे स्पष्ट करताना रोहितने ICC स्पर्धेतील आव्हानांबाबत मत मांडले. तो म्हणाला,'' आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणे, हे नक्कीच आव्हान आहे. आम्ही आमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करून खेळणार आहोत. २०१३मध्ये आम्ही अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाकडून नेहमीच प्रचंड अपेक्षा असतात. ही स्पर्धा आमच्यासाठी एक संधी आहे. पाकिस्तानची गोलंदाजी चांगली आहे आणि आमच्या फलंदाजांकडे पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे हा सामना चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल. आमच्यासाठी गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही महत्त्वाचे आहे आणि क्षेत्ररक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.''
रोहित म्हणाला, "मला दबाव हा शब्द वापरायचा नाही. कारण तो सतत असतो. हा पाकिस्तानी संघ खूप आव्हानात्मक आहे. मी खेळलेले पाकिस्तानचे सर्व संघ चांगले आहेत. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांचा दिवस होता. आशिया चषक स्पर्धेतही ते सरस होते. आशिया चषकात सुदैवाने आम्हाला त्यांच्याविरुद्ध दोनदा खेळायला मिळाले. पाकिस्तानविरुद्ध फारसे खेळायला मिळत नाही. आम्हाला त्यांची ताकद व कमकुवतपणा, याचे मोजमाप करायचे होते. फेव्हरिट व अंडरडॉग्स या संकल्पनांवर माझा विश्वास नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत अशा चर्चा रंगत असतात. वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करूया कारण ते आमच्यासाठी महत्वाचे आहे. नंतर काय होईल याची काळजी करू नका. आशिया चषक २०२३बाबत बीसीसीआय निर्णय घेईल. आम्ही उद्याच्या सामन्यासाठी चांगली तयारी कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup 2022, Indian captain Rohit Sharma, pre-match press conference: Pakistan bowling BIG Challenge, amid rain-threat, PLAYING XI to be finalized only before match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.