T20 World Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. पण, रवींद्र जडेजानंतर प्रमुख गोलंदाज जसप्री बुमराह याच्याही दुखापतीने डोकं वर काढलं आहे. BCCI अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार जसप्रीतने अजूनही वर्ल्ड कपमधून माघार घेतलेली नाही. तरीही तो किती सामने खेळल याबाबत साशंकता आहेच. मोहम्मद शमी किंवा दीपक चहर या राखीव खेळाडूंपैकी एकाची मुख्य संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यात राहुल द्रविड हा भारतीय फलंदाजांच्या तयारीत कोणतीच उणीव राहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसतोय.
टीम इंडिया ५ किंवा ६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. आता भारतीय संघासोबत तीन युवा जलदगती गोलंदाजही ऑस्ट्रेलियाचा प्रवास करणार आहेत. चेतन सकारिया, कुलदीप सेन व मुकेश चौधरी यांची भारताच्या नेट बॉलर्समध्ये एन्ट्री झाली आहे. भारताच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य श्रेयस अय्यर व दीपक चहर यांची आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीच्या संघात निवड झाली आहे. त्यामुळे ते वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नंतर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. मात्र, चेतन, कुलदीप व मुकेश यांचा या वन डे मालिकेत समावेश नाही आणि ते मुख्य संघासोबतच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. चेतन व मुकेश हे डावखुरे गोलंदाज आहेत. चेतन व कुलदीप हे सध्या इराणी चषक स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे. एनसीएमध्ये बीसीसीआयच्या मेडिकल टीमने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर नसून, स्ट्रेस रिअॅक्शन असल्याचे समोर आले आहे. ही फ्रॅक्चरच्या आधीची पातळी आहे. त्यामुळे त्याला तंदुरुस्त होण्यासाठी ४ ते ६ महिने नाही तर ४ ते ६ आठवडे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही व्यवस्थित झालं तर जसप्रीत बुमराह वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडमध्ये खेळताना दिसेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"