T20 World Cup 2022 : भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना झाला. BCCI ने टीम इंडियाचे खेळाडू व सहाय्यक स्टाफ सदस्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आदी १४ खेळाडूच या फोटोत दिसल्याने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. त्यात अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा ( Deepak Hooda) याच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. जसप्रीत बुमराहच्या माघारीनंतर त्याची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच १४ खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी जसप्रीतच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढले आणि त्याला वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली. मोहम्मद शमी किंवा दीपक चहर हे दोन पर्यात BCCI समोर आहेत, परंतु शमीला तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागणार आहे. दीपकची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली आहे, परंतु तो आणि श्रेयस अय्यर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत भारताकडे बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर करण्याचा कालावधी आहे. भारतासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे दीपक हुडा तंदुरूस्त झाला असून तो ट्वेंटी-२०साठी उपलब्ध आहे.
''संघातील अनेक खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळलेले नाहीत आणि त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर जात आहोत. पर्थ येथील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर आम्ही सराव करणार आहोत. या संघातील ७-८ खेळाडूच ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. त्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही सराव सामने खेळणार आहोत आणि त्यानंतर ICCचे दोन सराव सामने आहेतच,''असे रोहित शर्मा म्हणाला. दुखापतग्रस्त खेळाडूच ही भारतासमोरील समस्या नाही, तर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांची सुमार कामगिरी ही खरी चिंतेची बाब आहे. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत ७३ धावा दिल्या होत्या. मोहम्मद सिराजची राखीव खेळाडूमध्ये निवड केली जाऊ शकते.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)
भारत वि. स्थानिक क्लब, १० ऑक्टोबर भारत वि. स्थानिक क्लब, १२ ऑक्टोबर भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबरभारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर
मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"