T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना सुखावणारे अपडेट्स समोर आले आहेत. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे वृत्त गुरुवारी समोर आले होते. BCCI ने त्यावर अद्यापही काही भाष्य केले नाही, पण बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत खेळणार नाही हे स्पष्ट केले. बुमराहच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप समावेशाबद्दल अधिकृत जाहीर न करणाऱ्या BCCIच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ ६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे आणि त्यांच्यासोबत बुमराह पण जाणार आहे. तेथेच त्याच्यावर उर्वरित उपचार केले जातील आणि १५ ऑक्टोबरला त्याच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
वर्ल्ड चॅम्पियन्स होणार मालामाल; एकूण ४५ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव
जसप्रीत बुमराहने स्ट्रेस फॅक्चरमुळे माघार घेतली. तुम्ही शरीराच्या एका भागावर जास्त ताण देता तेव्हा स्नायू किंवा हाडांना दुखापत होऊ शकते किंवा छोटं फ्रॅक्चर होऊ शकतं. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० लढतीपूर्वी सराव सत्रात स्ट्रेस फॅक्चरने डोकं वर काढलं आणि तो त्वरित बंगळुरू येथील NCAमध्ये स्कॅनसाठी गेला. बुमराह आता वर्ल्ड कप खेळणार नाही, असाच अंदाज सुरुवातीला बांधला गेला, परंतु आता सकारात्मक वृत्त समोर येतेय. जसप्रीत बुमराहाला स्ट्रेच फॅक्चर झालेला नाही आणि ४-६ आठवड्यानंतर तो पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी परतेल. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सुरुवातीचे काही सामने मुकणार हे निश्चित आहे.
InsideSportला BCCI अधिकाऱ्याने सांगितले की,''बुमराहला विश्रांतीची गरज आहे आणि तेच पाठीच्या दुखण्यावरील उत्तम उपचार आहे. सध्या तो NCA च्या वैद्यकिय स्टाफशी संपर्कात आहे. नीतीनही त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळेल, असा विश्वास आहे. तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे आणि तेथेच पुढील उपचार गेणार आहे. संघात बदल करण्यासाठी आमच्याकडे १५ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.''
जसप्रीत बुमराहला खेळवण्याची घाई केली- वासिम जाफर भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर यानं जसप्रीतच्या दुखापतीबाबत मोठं विधान केलं. तो म्हणाला, कदाचित जसप्रीतला स्ट्रेच फॅक्चर आधीच झालं असावं. दोन मॅच खेळल्यामुळे त्यावरील प्रेशर वाढलं आणि ती दुखापत अधिक बळावली. त्याच्या पुनरागमनाची घाई केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं. तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहिला असता. त्याची दुखापती किती गंभीर आहे, याची कल्पना नाही. पण, त्याला अधिक काळ विश्रांती मिळायला हवी होती.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"