T20 World Cup 2022: टीम इंडियाचा T-20 वर्ल्ड कप 2022 मधील प्रवास संपला आहे. आज(10 नोव्हेंबर) झालेल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 10 गडी राखून दारुण पराभव झाला. आता विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होईल. दरम्यान, भारताच्या पराभवावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खिल्ली उडवली. यानंतर भारतीयांनीही त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या पराभवावर ट्विट करत रविवारी झालेल्या इंग्लंड-पाकिस्तान अंतिम सामन्याबद्दल सांगितले. या ट्विटमधून त्यांनी टीम इंडियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. शरीफ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, '152/0 विरुद्ध 170/0 असा अंतिम सामना रविवारी होणार आहे.' यावर भारतीय चाहते संतापले आणि त्यांनी शरीफला सडेतोड उत्तर दिले.
ट्विटचा अर्थ काय?भारताने गुरुवारी T-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. इंग्लंडची धावसंख्या 170/0 होती. गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या 152/0 होती. धावसंख्येचा उल्लेख करत शरीफ यांनी भारताला टोमणा मारला आहे.
शरीफ यांच्या ट्विटवर नेटकरी संतापले
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ट्विटला भारतीय युजर्सनी चोख प्रत्युत्तर दिले. एकाने लिहिले की, 'तुम्ही कोणाला सपोर्ट कराल..कारण तुमचे पैसे इंग्लंडमध्ये गुंतवले आहेत.'
एका युजरने लिहिले, 'तुम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे कॉमेडियन?'
यावेळी एका युजरने शरीफ यांना 1971 च्या युद्धाची आठवण करून दिली आणि तुमचा रेकॉर्ड 93000/0 असल्याचे सांगितले.
फक्त भारतीयच नाही तर पाकिस्तानी युजर्सनीही शाहबाज शरीफ यांना ट्रोल केले आणि लिहिले की विश्वचषकाशिवाय देशावरही लक्ष केंद्रित करा.
उपांत्य सामन्यात काय घडले?
T-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली आणि रोहित-राहुल या सलामीच्या जोडीने निराशा केली. यानंतर सूर्या आणि ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरीस हार्दिक पांड्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या बळावर भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. दुसरीकडे इंग्लंडने हा सामना एकतर्फी केला. इंग्लंडने एकही विकेट न गमावता ही धावसंख्या गाठली.
भारतीय खेळाडू फेल...इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना शाळकरी मुलांप्रमाणे मैदानात धूळ चारली. बटलरने 49 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या आणि अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूंत नाबाद 86 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि सात षटकारांचा समावेश आहे. फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही निराशा केली. मोहम्मद शमीपासून ते अर्शदीप सिंगपर्यंत सगळेच अपयशी ठरले.