T20 World Cup 2022, Rohit Sharma Press Conferance : आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सर्व पर्वात खेळणाऱ्या चार खेळाडूंपैकी रोहित शर्मा हा एक आहे. १५ वर्षांपूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली वहिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. पण, त्यानंतर भारतीय संघाला एकदाही ही स्पर्धा जिंकता आली नाही. २००७मध्ये रोहित २० वर्षांचा होता आणि तरीही त्याने आपला प्रभाव पाडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३० धावा केल्या.
IND vs PAK सामन्यासाठी रोहित शर्माची प्लेइंग इलेव्हन ठरली, मोहम्मद शमीला स्थान मिळणार की नाही?
या १५ वर्षांत रोहित जगासमोर हिटमॅन म्हणून उभा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहे. आता त्याच्याकडे कर्णधाराची जबाबदारीही आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये भारताच्या चांगल्या कामगिरीचे दडपणही त्याच्यावर आहे. पण, रोहितने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीच्या पुनरावृत्तीचा विश्वास व्यक्त केला आहे. ३५ वर्षीय रोहितकडे आता १४० हून अधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव आहे.
''२००७साली जेव्हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझी निवड झाली, तेव्हा मला स्वतःकडून फार अपेक्षा नव्हत्या. मला त्या स्पर्धेचा आनंद लुटायचा होता आणि पहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची होती. वर्ल्ड कप संघाचा भाग असणे, म्हणजे काय हे तेव्हा मला कळलेही नव्हते आणि वर्ल्ड कप जिंकेपर्यंत ही स्पर्धा किती मोठी आहे, याची क्लपनाही नव्हती,''असे रोहित म्हणाला. रोहितसह झिम्बाब्वेचा सिन विलियम्स, बांगालदेशचा शाकिब अल हसन आणि भारताचा दिनेश कार्तिक हे २००७चा वर्ल्ड कप खेळले आहेत.
रोहित म्हणाला,''हा खूप लांबचा प्रवास आहे आणि या खेळाने बरेच काही शिकवले आहे. २००७मध्ये आम्ही कसं खेळत होतो आणि आता कसं खेळतोय, यातला फरक तुम्ही पाहू शकता. १४० किंवा १५० ही धावसंख्या तेव्हा मोठी वाटायची, परंतु आता खेळाडू १४-१५ षटकांत या धावा पार करतात. निकालाची चिंता न करता संघ आता अधिक धोका पत्करून खेळतात आणि या फॉरमॅटसाठी हाच योग्य मार्ग आहे. आमचा संघही तेच करणार आहे. निडरपणे खेळणार.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"