Join us  

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप खूप मोठं व्यासपीठ, पण जसप्रीतचे करियर अत्यंत महत्त्वाचे; Rohit Sharma असं का म्हणाला?

T20 World Cup 2022 : Rohit Sharma Press Conference : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की भारतावर ओढावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 9:03 AM

Open in App

T20 World Cup 2022 : Rohit Sharma Press Conference : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेला रविवारपासून सुरूवात होतेय... १६ संघांमध्ये वर्ल्ड  कप उंचावण्याची ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा तिकीटही १० मिनिटांत संपली... रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की भारतावर ओढावली होती. पण, यंदा भारतीय संघाचा फॉर्म जबरदस्त आहे, दुखापतीमुळे दोन प्रमुख खेळाडू बाहेर पडले असले तरी हा संघ प्रतिस्पर्धींना कडवी टक्कर देण्याची धमक राखतो.

३८ कसोटी, ४२ वन डे, ६१ ट्वेंटी-२०! भरगच्च कार्यक्रम, India vs Pakistan मालिकेबाबत BCCIचा निर्णय

वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी शनिवारी १६ संघांच्या सदस्यांच संयुक्तपणे पत्रकार परिषद पार पडली. यात रोहित शर्मा, बाबार आजम, अॅरोन फिंच आदींनी जेतेपदाचा निर्धार बोलून दाखवला. सूर्यकुमार यादव मोहम्मद शमी यांच्याबाबत रोहितने केलेले विधान चर्चेचे ठरले. रोहितच्या मते सूर्याकुमार भारतीय संघाचा X फॅक्टर आहे आणि रविवारी होणाऱ्या सराव सत्रात शमीची गोलंदाजी कशी होते, हे पाहणार असल्याचेही त्याने म्हटले. पण, त्याचवेळी रोहितने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत ( Jasprit Bumrah) जे मत व्यक्त केले त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत जसप्रीतला खेळवण्याची घाई केली आणि त्याच्या पाठीच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर वर्ल्ड कप मधूनही माघार घ्यावी लागली.

जसप्रीतच्या जागी मोहम्मद शमी ( Mohammed Shami)  मुख्य संघात खेळणार असल्याचे बीसीसीआयने कालच जाहीर केले. त्यावर रोहित म्हणाला,''मोहम्मद शमीला अद्याप मी भेटलेलो नाही, पंरतु जे काही मी ऐकलं आहे, त्यावरून तो तंदुरुस्त आहे असे मला समजते. NCA मध्ये त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. रविवारी ब्रिस्बन येथे सराव सत्र आहे आणि त्यात शमी कशी गोलंदाजी करतो हे पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेईन.''

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निडर खेळ करण्याचा पवित्रा आम्ही स्वीकारला आहे. १४० धावांचे लक्ष्य असेल तर ते १४-१५ षटकांतच पार करण्याचे आमचे ध्येय असेल, असे रोहित म्हणाला. यावेळी त्याला जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत विचारले असता त्याने सांगितले की, ''जसप्रीत बुमराहला खेळवण्याचा धोका पत्करू शकतो का, असे आम्ही अनेक तज्ज्ञांना विचारले. त्या सर्वांनी नकार दिला. जसप्रीत हा आता २७-२८ वर्षांचा आहे आणि तो अजून बरीच वर्ष क्रिकेट खेळू शकतो. वर्ल्ड कप हे मोठे व्यासपीठ आहे, परंतु त्याची कारकीर्द ही अत्यंत महत्त्वाची आहे. हो पण आम्ही त्याला मिस करू.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2रोहित शर्माजसप्रित बुमराहमोहम्मद शामीसूर्यकुमार अशोक यादव
Open in App