Join us  

T20 World Cup 2022: सुनिल गावस्कर यांना सतावतेय रोहित शर्माची चिंता; सांगितलं भारतासमोरील खरं आव्हान

भारतीय संघाने विश्वचषकातील आपली मोहिम पाकिस्तानविरूद्धच्या विजयाने सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 1:55 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाने विश्वचषकातील आपली मोहिम पाकिस्तानविरूद्धच्या विजयाने सुरू केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने ४ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. मात्र एक संघ म्हणून संघाची कामगिरी निराशाजनक होती असे जाणकारांचे म्हणणे आहे. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेन इन ब्लू संघाने विराट कोहलीच्या ५३ चेंडूत ८२* धावांच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केले. खरं तर पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या ३१/४ होती. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी महत्त्वाची भागीदारी नोंदवली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारत अडचणीत सापडला होता. 

भारताचा आगामी सामना नेदरलॅंडविरूद्ध गुरूवारी सिडनीमध्ये होणार आहे. भारताच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गावस्कर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले, "भारतीय संघाबाबत एकमात्र चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्माला आपण ज्या क्षमतेसाठी ओळखतो त्या क्षमतेने त्याने धावा केल्या नाहीत. मला वाटते की जर त्याने त्याच्या जुन्या लयनुसार खेळायला सुरूवात केली तर खरोखरच संघाला फायदा होईल." 

टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती आणि दोन सामन्यांच्या विजयासह मालिकेवर कब्जा केला होता. तसेच रोहितला सराव सामन्यांमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये देखील धावा करता आल्या नव्हत्या. त्याने ३ डावांमध्ये केवळ १५ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांना वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजाला पाकिस्तानविरूद्ध मोठी खेळी करता आली नव्हती. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताची सर्वोच्च फळी पाकिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे ढासळली याचा दाखला देत गावस्कर यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये गडी राखून धावा करण्याचा सल्ला दिला. 

भारतीय संघाची फलंदाजी सुधारली पाहिजे - गावस्कर "चांगला फ्लॅटफॉर्म म्हणजे सर्वांनी चांगली खेळी करणे. सुरूवातीपासून शानदार फलंदाजी झाली असेल तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाला सुरूवातीपासून मोठे फटकार मारणे सोपे जाते. त्यांना स्वत:ला वेळ देण्याची गरज भासत नाही. ३१ धावांवर चार गडी बाद असताना भारताला पाकिस्तान विरुद्ध जे करावे लागले होते, त्यामुळे सुरूवातीच्या फलंदाजीवर लक्ष द्यावे लागणार आहे. सुरूवातीच्या पाच षटकांमध्ये १ बाद ४० धावा अशी धावसंख्या ठीक आहे. मात्र ३१ धावांवर ४ गडी बाद होणे ही स्थिती खराब आहे", अशा शब्दांत गावस्करांनी भारताच्या सुरूवातीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानसुनील गावसकररोहित शर्माविराट कोहली
Open in App