नवी दिल्ली-
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात सरावाला सुरुवात केली आहे. पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय खेळाडूंनी ऑप्शनल प्रॅक्टीस सेशनची निवड केली. ऑप्शनल प्रॅक्टीस सेशनमध्ये खेळाडूंना या सेशनला उपस्थित राहण्याची सक्ती नसते. आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघाच्या याच ऑप्शनल प्रॅक्टीस सेशनवर भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील सावस्कर संतापले आहेत.
मेलबर्नमध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असतानाही भारतीय संघानं शुक्रवारी ऑप्शनल प्रॅक्टीस सेशनचा पर्याय का निवडला?, असा सवाल सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. इंडिया टुडेसोबत बोलत असताना गावस्कर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भारतीय संघानं वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधी प्रॅक्टीस सेशनमध्ये लयीत येणं गरजेचं आहे, असं गावस्कर म्हणाले.
रोहितसह काही खेळाडूंनी केला सरावभारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर प्रॅक्टीस सेशनला हजेरी लावली. रोहितसोबत दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदिप सिंग आणि मोहम्मद शमी सहभागी झाले होते. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही एक व्हिडिओ क्लिप शेअर केली ज्यात पाकिस्तानचे खेळाडू देखील नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
"मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही कारण मेलबर्नमध्ये येण्याआधी तुमचा सराव सामना होऊ शकला नाही. त्यानंतर एका दिवसाच्या सुट्टीनंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रॅक्टीस न करण्याचा पर्याय निवडता. प्रॅक्टीससाठी जे आले नाहीत ते कदाचित मॅच विनर ठरतीलही पण एक संघ म्हणून तुम्ही स्पर्धेआधीच लय प्राप्त करणं गरजेचं असतं. एक मिशन म्हणून तुमची भावना जागृत होते", असं सुनील गावस्कर म्हणाले.