T20 World Cup 2022: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला रवाना होण्यासाठी अवघे २४ तास उरले आहेत आणि अद्यापही जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) जागी कोणाला संधी मिळतेय, हे निश्चित होत नाही. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने १८ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आणि ६ ऑक्टोबरला खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील, परंतु त्यात १५वा खेळाडू नसेल. जसप्रीतच्या जागी कोण, या प्रश्नाचे उत्तर BCCI लाच अद्याप मिळालेले नाही. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका घेतली आहे.
BCCI व रोहित यांच्या सावध पवित्र्यामागे एक मोठं कारण आहे. मोहम्मद शमी अजूनही तंदुरुस्त आहे, असे वाटत नाही. बुमराहच्या जागी शमीचे नाव आघाडीवर आहे. पण, बीसीसीय, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन कोणताही निर्णय घाईत घेण्याच्या तयारीत नाही. कोरोनातून सावरल्यानंतर शमीच्या तंदुरुस्तीवर त्यांचे लक्ष आहे आणि NCA त फिटनेस टेस्टनंतर निर्णय घेतला जाईल. मागील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शमी ट्वेंटी-२० सामने खेळलेला नाही. सराव व्हावा यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड केली गेली, परंतु कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला अन् त्याला माघार घ्यावी लागली.
शमीने नेट्समध्ये गोलंदाजी केलीय, परंतु तरीही १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो कितपत तयार आहे, याची साशंकता नाही. त्यामुळेच त्याला NCA मध्ये रिपोर्ट करायला सांगितले आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही शमीच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्याने १५ ऑक्टोबरपर्यंत आमच्याकडे बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर करण्याचा कालावधी असल्याचेही स्पष्ट केले. ''दुर्दैवाने शमी मालिका खेळू शकला नाही. बुमराहला पर्याय म्हणून तो सक्षम स्पर्धक आहे, परंतु त्याला NCA मध्ये जावे लागेल. तेथून अहवाल आल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. तो फिट असल्याचा अहवाल आल्यास त्याचाच नक्की विचार होईल,''असेही द्रविड म्हणाला.
शमी तंदुरुस्त चाचणीत अपयशी ठरला तर मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांचा विचार केला जाईल. चहरचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केला गेलाच आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जसप्रीतच्या जागी सिराजला संधी मिळाली. चहर सध्या आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका खेळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"