मेलबर्न - टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने हे बुधवार आणि गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ सिडनीमध्ये आमने-सामने येतील. तर गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ एकमेकांना भिडतील. मात्र या वर्ल्डकपमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर बॅटिंग करत अनेक सामन्यांचे निकाल बदलवले होते. त्यामुळे दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
जर दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला तर काय समिकरणे बनतील. याचा थोडल्यात आढावा पुढीलप्रमाणे. टी-२० वर्ल्डकपमध्ये रिझर्व्ह डेची सोय केवळ उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी करण्यात आली आहे. म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील सामन्यामध्ये पाऊस पडल्यास सामना राखीव दिवशी १० नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. अशीच सुविधा भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी असेल. जर गुरुवारी होणाऱ्या या सामन्यात पाऊस पडला. तर सामना राखीव दिवशी शुक्रवारी खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियामध्ये लहरी हवामानाबाबत काही भाकित करता येणारे नाही. त्यामुळे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पावसामुळे होऊ न शकल्यास सुपर-१२ फेरीतील गुणतालिकेनुसार अंतिम फेरीतील स्पर्धकाची निवड केली जाईल. ग्रुप-१ मध्ये न्यूझीलंडने अव्वलस्थान पटकावले होते. तर ग्रुप-२ मध्ये भारताने अव्वलस्थान पटकावले होते. त्यामुळे दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पाऊस पडून सामने रद्द करायची वेळ झाल्यास भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत दिसतील.
जर कुठल्याही एका सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि दुसऱ्या सामन्याचा निकाल लागला तर आधी निश्चित केलेल्या नियमाप्रमाणे निकाल लावला जाईल. जर रिझर्व्ह डे दिवशीसुद्धा पावसाचा व्यत्यय आला तर जेवढा खेळ झाला असेल त्या आधारावर डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये अनेक ट्विस्ट दिसण्याची शक्यता आहे.