T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 गटाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आदी तगडे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले, तर अमेरिका हा नवखा संघ सुपर ८ मध्ये तगड्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या ग्रुप १ मधील चौथा स्पर्धक आज निश्चित झाल्याने सुपर ८ गटाचं संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. बांगलादेश ग्रुप १ मध्ये आता भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे, तर ग्रुप २ मध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळतील आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाची पहिली लढत २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे आणि या सामन्यासाठी खेळाडूंनी पुरेशा विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय फलंदाजांनी आज नेट्समध्ये घाम गाळला, परंतु स्टार खेळाडूला दुखापत झाल्याने चिंता वाढली. भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याला सराव करताना नेट्समध्ये दुखापत झाली. थ्रो डाऊन स्पेशालिस्टने टाकलेला चेंडू सूर्याच्या हाताला लागला आणि त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली होती. पण, स्प्रे मारून अन् थोडा आराम करून तो पुन्हा सरावाला आला. त्यामुळे त्याची दुखापती फार गंभीर नसल्याचे समजले.