T20 World Cup 2024 : पाकिस्तानच्या संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी नवख्या अमेरिका संघाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी प्रथम शरणागती पत्करली आणि कशीबशी १५९ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर क्षेत्ररक्षणातील गचाळपणा आणि दिशाहीन गोलंदाजीने त्यांची पार वाट लावली. अमेरिकेने १५९ धावा चोपून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला आणि तिथे विजयाचा पताका रोवला. पाकिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नाही आणि त्यामुळे चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.
पाकिस्तानी गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! USA ला हरवण्यासाठी रडीचा डाव?
बाबर आजम ( ४४) , शादाब खान ( ४०) व शाहीन आफ्रिदी ( २३) यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने १५९ धावा उभ्या केल्या, त्याला अमेरिकेकडून मोनांक पटेल ( ५०), अँड्रीस गौस ( ३५), आरोन जोन्स ( ३६*) आणि नितीश कुमार ( १४*) यांनी सडेतोड उत्तर दिले. नितीशने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये खेचला. अमेरिकेने त्यात १८ धावा केल्या आणि पाकिस्तानला १ बाद १३ धावाच करता आल्या. पाकिस्तानचा पुढील सामना ९ जून रोजी भारताविरुद्ध होणार आहे.
वसीम अक्रम ( Wasim Akram) याने सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांची व्यथा मांडणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ पोस्ट केला. नबिहा असे या तरुणीचे नाव आहे आणि ती अमेरिकेत स्थायिक आहे. पाकिस्तानला चिअर करण्यासाठी काल ती सामना पाहायला आली होती, परंतु संघाच्या लाजीरवाण्या कामगिरीने तिला हताश केले.
ती म्हणते, माझं एकच हृदय आहे आणि ते किती वेळा तुम्ही तोडणार. ते तोडून तोडून तुम्ही त्याचा पार चुराडा केला आहे. हे लोकं जिंकतात कमी हरतात जास्त... तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही नेहमी तयार आहोत, पण तुम्ही कधी तसं खेळणार. फक्त हवेत बाता हाकता.. तुम्ही फक्त इथे फिरायला येता आणि खेळायचं म्हणून खेळता, असं वाटू लागलं आहे. तुम्हा आमची काहीच पर्वा नाही.