Join us  

AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला

T20 World Cup 2024, AFG vs NZ Live : अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 8:13 AM

Open in App

AFG vs NZ Live Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुरुवातीपासूनच मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला, तर कॅनडाने आयर्लंडला नमवून विश्वचषकात विजयाचे खाते उघडले. अशातच शनिवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत किवी संघाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. (AFG vs NZ Match News)

अफगाणिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला घाम फुटला. राशिद खान, फजलहक फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी फिरकीच्या जोरावर किवी संघाचा दारूण पराभव केला. किवी संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक १८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खानने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर फजलहक फारुकी (३) आणि मोहम्मद नबीने (२) बळी घेतले. अखेर किवी संघ १५.२ षटकांत सर्ववाद केवळ ७५ धावा करू शकला आणि ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रहमानुल्लाह गुरबाजच्या (८०) स्फोटक खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यांना निर्धारित २० षटकांत ६ बाद १५९ धावा करण्यात यश आले. रहमानुल्लाह गुरबाजने ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५६ चेंडूत ८० धावांची अप्रतिम खेळी केली. गुरबाजशिवाय इब्राहिम झादरानने ४१ चेंडूत ४४ धावांची सावध खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि मॅट हेनरी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. बोल्टने ४ षटकांत २२ धावा तर हेनरीने ४ षटकांत ३७ धावा दिल्या. तर लॉकी फर्ग्युसनला एक बळी घेण्यात यश आले.

अफगाणिस्तानचा संघ - राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झादरान, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन,डेव्होन कॉन्वे, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसव्हेल, मिचेल सँटनर, मॅट हेनरी, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन. 

टॅग्स :अफगाणिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंड