AFG vs BAN :अफगाणिस्तानने किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस वेल ग्राउंडवर इतिहास रचला. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ मध्ये बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना गुरुवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मात्र या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सामन्यात शेवटच्या काही मिनिटांमध्ये आश्चर्यकारक खेळ पाहायला मिळाला.
टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात जेवढे नाट्य घडले ते बॉलीवूडच्या चित्रपटातही दिसत नाही. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा असा होता. मात्र या सामन्याच्या निकालावर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे भवितव्य अवलंबून होते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला विजयाची गरज होती. तसेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला १२ षटकांत लक्ष्य गाठायचे होते आणि ऑस्ट्रेलियाला बांगलादेशला विजयाची गरज होती. मात्र अफगाणिस्तानने हा सामना आठ धावांनी जिंकून बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. पण या सामन्यानंतर दोनच व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ते म्हणजे गुलबदिन नायब आणि प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट. दोघांनी असे काही केले ज्याची कोणालाच कल्पना नसेल.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात भारतीय वेळेनुसार सकाळी एक जबरदस्त सामना झाला. पण, पावसाने वेळोवेळी सामना व्यत्यय आणला. ११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डावही गडगडला. ८० धावांपर्यंत बांगलादेशचे ७ खेळाडू बाद झाले होते. त्यानंतर हलका पाऊस सुरू झाला. त्यावेळी अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना काही सूचना देण्यास सुरुवात केली. माध्यमांच्या वृत्तानुसार ते खेळाडूंना खेळाची गती कमी करण्यास सांगत होते आणि त्यांची ही सूचना संघाचा स्टार गोलंदाज गुलबदिन नायब याला लगेच समजली.
स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा गुलबदिन क्षणात जमिनीवर कोसळा. असे वाटत होते की त्याला खूप वेदना होत आहेत. हे पाहून खुद्द रशीद खान देखील चकित झाला. अचानक गुलबदिन जमिनीवर कोसळल्याने असं काय घडलं याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण खरी गोष्ट तेव्हा समजली जेव्हा सर्वांची नजर धावफलकाकडे गेली. बांगलादेशची धावसंख्या ८१ अशी होती. तर डकवर्थ लुईसनुसार त्याच्यासाठी ८३ धावा होत्या.
त्यामुळे सामन्याला थोडा उशीर झाला आणि पाऊस येण्यापूर्वी बांगलादेशला ८३ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. म्हणूनच गुलबदिन मैदानातच मुद्दाहून खाली पडल्याचे म्हटलं जात आहे. मात्र, काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला आणि गुलबदिन सुखरूप मैदानात परतला. इतकेच नाही तर काही वेळाने त्याने गोलंदाजीही केली. त्यानंतर अफगाणिस्तानाने हा सामना आठ धावांनी जिंकला.
दरम्यान, गुलबदीनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असून त्याच्या या क्रॅम्पला लोक अभिनय म्हणत आहेत. यासोबतच अफगाणिस्तान संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकण्यासाठी मदत व्हावी म्हणून सामना थांबवण्यासाठी त्याने हे जाणूनबुजून केले असा आरोपही त्याच्यावर केला जात आहे.