AFG vs AUS : हम किसी से कम नहीं! वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलिया चीतपट

T20 World Cup 2024 AUS vs AFG: बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारून अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:30 AM2024-06-23T10:30:55+5:302024-06-23T10:31:36+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 AUS vs AFG Afghanistan beat Australia by 21 runs | AFG vs AUS : हम किसी से कम नहीं! वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलिया चीतपट

AFG vs AUS : हम किसी से कम नहीं! वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलिया चीतपट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सुपर-८ च्या फेरीत अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानने सातवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानने २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १४९ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १२७ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने सर्वाधिक चार बळी घेतले. तर नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियन संघाने ६ वेळा वन डे विश्वचषक आणि एकदा  ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांचा पुढचा सामना जिंकणे गरजेचे आहे. शनिवारी बांगलादेशला नमवून भारताने या गटातून उपांत्य फेरीत जागा मिळवली.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करताना कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने ४९ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ६० धावा कुटल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. इब्राहिम झादरानने ५१ धावांची खेळी केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. त्याने (३) तर डम झाम्पाने (२) बळी घेतले.

अफगाणिस्तानने दिलेल्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला घाम फुटला. त्यांचा संघ १९.२ षटकांत अवघ्या १२७ धावांत गारद झाला आणि सामना २१ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५९ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले मात्र तो आपल्या संघाला विजयी करू शकला नाही. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबने चार बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याने ४ षटकांत अवघ्या २० धावा दिल्या. तर नवीन-उल-हकने तीन बळी घेऊन आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. याशिवाय मोहम्मद नबी, राशिद खान आणि उमरजई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

Web Title: T20 World Cup 2024 AUS vs AFG Afghanistan beat Australia by 21 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.