T20 World Cup 2024, AUS vs NAM : प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत दबदबा दाखवत ऑस्ट्रेलियाने नामिबियाविरूद्ध मोठा विजय मिळवला. या विजयासह कांगारूंनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅटट्रिक ऑस्ट्रेलियाला सहा गुण देऊन गेली. त्यांच्यापाठोपाठ ब गटात ५ गुणांसह स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात नामिबियाने दिलेल्या ७३ धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. विश्वचषकातील २४ वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला.
७३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. अवघ्या ५.४ षटकांत १ बाद ७४ धावा करून कांगारूंनी मोठा विजय साकारला. डेव्हिड वॉर्नर २० धावा करून बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेड (नाबाद ३४ धावा) आणि कर्णधार मिचेल मार्शने नाबाद १८ धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट निश्चित केले.
ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कमाल करून नामिबियाला चीतपट केले. नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मस (३६) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर नामिबियाचा संघ १७ षटकांत ७२ धावांवर सर्वबाद झाला. फिरकीपटू ॲडम झाम्पाने कमाल करताना चार बळी घेऊन नामिबियाच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याच्याशिवाय जोश हेझलवुड (२), मार्कस स्टॉयनिस (२) आणि पॅट कमिन्स आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नामिबियाविरूद्धचा सामना जिंकून सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले. तसेच सुपर ८ मध्ये स्थान मिळवणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला आहे. या आधी दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ चे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे, आज अमेरिका आणि भारत यांच्यात लढत होणार आहे. यातील विजयी संघ देखील सुपर ८ चे तिकीट मिळवेल. कारण दोन्हीही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ -मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
नामिबियाचा संघ -गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), निकोलास डेव्हिन, मायकल वॅन लिंगन, जान फ्रायलिनकक, जे जे स्मिट, जेन ग्रीन, डेव्हिड विसे, रूबेन ट्रम्पलमॅन, बर्नार्ड शोल्टज, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो.