T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. शेजाऱ्यांना साखळी फेरीतील चारपैकी दोन सामने गमवावे लागले. अमेरिका आणि भारताकडून झालेल्या पराभवामुळे बाबरच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानच्या चाहत्यांसह शेजारील देशातील माजी खेळाडू बाबर आझमवर सडकून टीका करत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर बाबरच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. खरे तर बाबरने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. (Babar Azam News)
२०१४ पासून प्रथमच पाकिस्तानी संघाला ट्वेंटी-२० विश्वचषकात साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. मागील विश्वचषकात उपविजेते पदावर शेजाऱ्यांना समाधान मानावे लागले. प्रथमच विश्वचषक खेळत असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून मोठा उलटफेर केला. मग अ गटातून भारत आणि अमेरिका या संघांनी सुपर-८ चे तिकीट मिळवले. स्पर्धेबाहेर होताच पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमवर तुटून पडले. मात्र, टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय बांगर यांनी बाबरसाठी बॅटिंग केली.
बांगर यांची बाबरसाठी बॅटिंग
संजय बांगर म्हणाले की, मला आजही वाटते की, पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी बाबर आझम योग्य खेळाडू आहे. त्याने अनेकदा डीआरएसबद्दल चांगले निर्णय घेतले आहेत, ज्याचा संघाला फायदा झाला. वन डे विश्वचषकानंतर बाबरला कर्णधारपदावरून काढण्यात आले. पण, पाकिस्तानची गाडी रूळावरून घसरल्याचे दिसताच पुन्हा एकदा त्याला कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे हे स्पष्ट होते की, कर्णधारपद सांभाळण्याची क्षमता त्याच्यातच आहे. बाबर आझमला पुढच्या विश्वचषकापर्यंत पाकिस्तानच्या संघाचे कर्णधार म्हणून खेळवायला हवे. ते 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होते.
तसेच पाकिस्तानच्या संघात आघाडीचे फलंदाज चांगले आहेत. २०२१ मध्ये त्यांनी भारताविरूद्ध १० गडी राखून विजय मिळवला होता. मधल्या फळीत फक्त त्यांच्यात विश्वासू फलंदाज नाहीत स्फोटक खेळी करणारा एकही शिलेदार त्यांच्याकडे नाही. मोहम्मद हारिस आणि अब्दुला शफीक यांनी वन डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, सातत्याची कमी असल्याने त्यांना बाकावर बसावे लागते. पण, पुढच्या विश्वचषकात ते बाबरसोबत एकत्र खेळताना दिसतील अशी आशा बाळगूया, असेही संजय बांगरने म्हटले.
Web Title: T20 World Cup 2024 Babar Azam should be the captain of Pakistan till the next World Cup, says Sanjay Bangar, former player of Team India.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.