BAN vs NED Match Updates : गुरूवारी ट्वेंटी-२० विश्वचषकात बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव करून सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. नेदलँड्सविरूद्ध शानदार खेळी करून बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या खराब कामगिरीनंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शाकिवर बोचरी टीका केली होती. पण, नेदरलँड्सविरूद्ध चांगली खेळी करताच शाकिबचा रूबाब वाढला अन् सेहवागच्या टीकेला त्याने त्याच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले. शाकिबचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पत्रकार त्याला सेहवागने केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारत आहे.
बांगलादेशने नेदरलँड्सविरूद्ध २५ धावांनी विजय साकारला. अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने निर्णायक खेळी करताना ९ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत ६४ धावा केल्या. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना शाकिबने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकाराने विचारले की, शाकिब पहिल्या दोन सामन्यांमध्ये तुला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यावरून तुझ्यावर टीका केली जात आहे. खासकरून वीरेंद्र सेहवागने याबद्दल भाष्य केले. पत्रकाराच्या प्रश्नावर शाकिब म्हणाला, "कोण". एकूणच शाकिबने सेहवागच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले आणि तो आपल्याला माहित नसल्याचे दर्शवले.
सेहवागची बोचरी टीकावीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत मला वाटले की शाकिब अल हसनची ट्वेंटी-२० संघात निवड होऊ नये. तो खूप आधी निवृत्त व्हायला हवा होता. तू इतका वरिष्ठ खेळाडू आहेस, तू या संघाचा कर्णधारही होतास. तुझ्या अलीकडील कामगिरीची तुला लाज वाटली पाहिजे. तू स्वतः पुढे ये आणि म्हणावे की खूप झाले, मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. जर तुझी वर्ल्ड कप टीममध्ये अनुभवासाठी निवड झाली असेल, तर ते सिद्ध कर की तो योग्य निर्णय होता. तू कमीत कमी थोडा वेळ खेळपट्टीवर घालवला पाहिजे. हुक आणि पुल शॉट खेळण्यासाठी तू ॲडम गिलख्रिस्ट किंवा मॅथ्यू हेडन नाही. तू बांगलादेशी खेळाडू आहेस आणि तुझ्या कुवतीप्रमाणे खेळ.
३७ वर्षीय शाकिब अल हसनने बांगलादेशसाठी आतापर्यंत एकूण ६७ कसोटी, २४७ वन डे आणि १२४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४५०५ धावा, वन डेत ७५७० धावा आणि ट्वेंटी-२०त २५१२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २३७, वन डेत ३१७ आणि ट्वेंटी-२०त १४६ बळी आहेत.